‘कधीच न पुसली जाणारी… एक आठवण’; स्वाती मराडे

‘कधीच न पुसली जाणारी… एक आठवण’; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आठवांचे ढग सभोवताली जेव्हा जमायला लागले; मन तेव्हा जरासे वेड्यासारखे वागायला लागले. पण ठरवलं होतं मी असं होऊ द्यायचं नाही.. पुन्हा कधीच त्या आठवणीत बुडायचं नाही.. मळभ तर येणारच पुन्हा पुन्हा बरसू पाहणारच.. पण त्यात नाही भिजायचं मला.. खंबीर मनाची छत्री घेतलीय मी सोबतीला.. पण हे काय अचानक झालं.. कसलं वादळ घोंगावू लागलं.. विचारांनी थैमान घातलं.. सभोवतीचे खंबीरतेचे कवच कोलमडून गेले.. अन् पुन्हा त्या आठवणीनी चहू बाजूंनी घेरले.. तू, मी अन् पाऊस.. एक आठवण अशीही नेहमीच सतावते मला.. कशाला पाठवतोस आठवणी.. तूच का येत नाहीस पावसात सोबत भिजायला..!

आजच्या चित्र चारोळी स्पर्धेसाठीचे चित्र.. दाटलेलं आभाळ.. सोसाट्याचा वारा.. उलटलेली छत्री अन् विस्कटलेला केशसंभार सारा.. हे सगळं पाहताच नकळत अनेक आठवणी जाग्या व्हाव्यात असेच.. एक आठवण अशीही मनात जपून ठेवलेली.. दरवर्षी पाऊस येताच अलगद नजरेत तरळलेली..!

छत्री अन् पावसाबरोबर प्रत्येकाच्याच अनेक आठवणी गुंफलेल्या असतात. लहान असताना छत्री नव्हतीच.. कधी कुठे पावसाने गाठले की बिनधास्त पावसात भिजायचे.. कागदी होड्यांना पाण्यात सोडायचे.. गारांच्या पावसात त्या वेचून तोंडात टाकायच्या.. पागोळ्या झेलायच्या नि येणारे तुषार अंगावर घ्यायचे.. या सुखद आठवणीबरोबरच आपण मोठे होतो.. पाऊस अन् छत्रीसोबत एक वेगळे नाते गुंफतो‌.. एकट्याची असणारी छत्री कधी दोघांना तर कधी तिघांनाही सामावून घेते.. त्या पावसात एका छत्रीखाली मैत्री घट्ट होते.. अनेक पावसाळे झेलत चिंब होण्यापासून वाचवते.. पण या पावसाबरोबरच असते एक आठवण अशीही जी अंगावर आणते शहारा.. रौद्र रूप पावसाचे नि सोबत थंडगार वारा..!

जीवनात आठवणींचे गाठोडे कायम सोबत असतेच. कधीही सोडावे अन् पुन्हा त्यात रमून जावे.. सुखद आठवणी सोबत असतेच एखादी कटू आठवणही.. अन् गंभीर प्रसंगातही सावरुन घेणारी असते एखादी सुखद आठवणही.. या केवळ आठवणी नाहीत तर अनुभव देणा-या गुरूसुद्धा वाटतात मला.

एक आठवण अशीही असते
कधीच न पुसली जाणारी
फिरते कालचक्र अविरत जरी
नवेपण जपून ठेवणारी..!

अत्तर संपलं तरी त्याचा दरवळ कुपीत शिल्लक असतोच.. बकुळ फुले सुकली तरी अंतरीचा गंध हरवत नाहीत.. तशीच असते ही एखादी आठवण कायम स्मरणात राहणारी.

आजच्या चित्रचारोळी स्पर्धेसाठी बकुळफुलासम रचनेतून केलेले शब्दलाघव अगदी मनभावन.. हृदयगाभा-यातून चित्रसापेक्ष व लाक्षणिक अर्थाने आलेल्या रचना अप्रतिमच. आपलं हे शब्दवैभव असेच समृद्ध होत राहो. या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐

आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार. 🙏

स्वाती मराडे, पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles