
‘नेतृत्व’; अनिता व्यवहारे
‘इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के,
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के’
‘नेता’ हा लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसणारा प्रतिष्ठित शब्द. परंतु नेता ही भूमिका वठवणारी व्यक्ती प्रामाणिक असते का? नेता कसा असावा? तर त्यासाठी आपल्याकडे खूप निकष लावले जातात. आदर्शवादाचे सर्व तत्व त्याच्या नसानसात भिनलेले असायला हवे. ‘आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व आणि हरलात तर मार्गदर्शन.’ या पद्धतीने जर विचार मनी बाळगले, तर तो कुशल नेतृत्व करू शकतो. आपल्या शरीरातील मेंदू आपल्या संपूर्ण शरीराचे नेतृत्व करणारा असतो. आणि तो सर्व मान्यही झाला. पण तरीही एकदा या अवयवांत नेतृत्वावरून वाद झाला. मेंदू म्हणाला मी सर्वश्रेष्ठ. हृदयाला स्वतःबद्दल खात्री होतीच. डोळ्यांना जग दिसत होतं. या सर्वांनी श्रेष्ठ नेतृत्व आपल्याकडे असायला पाहिजे असा दावा केला. तेव्हा मोठ आतडं आलं धावून. सगळ्यांनी त्याची थट्टा केली.तेव्हा त्याला खूप राग आला व त्याने संपावर जायचं ठरवलं. मग काय त्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण बंद केलं. शरीरातील हे विषारी द्रव्य शरीरातच राहू लागली. आणि त्यामुळे शरीराची सर्व अवस्था कोलमडली परिणामी त्याला त्यावेळी नेतृत्व देणं भाग पडलं.
नेतृत्व ही फक्त वैयक्तिक शक्ती नसून त्याचा परिणाम इतरांवर देखील होत असतो. नेतृत्व म्हणजे एखाद्या कडून मिळालेली पदवी, कामातील बढती किंवा हुद्दा, नाही तर ती एखाद्या कडून किंवा समूहाकडून केली जाणारी अपेक्षा असते. नेतृत्व म्हणजे ठरवून दिलेली किंवा घेतलेली जागा नसून व्यक्तीकडून होणारी कृती असते. जर नेतृत्व म्हणजे अधिकार असे आपण मानले तर त्याबरोबरच ती जबाबदारीही असते हेही विसरायला नको. नेतृत्व करायचं असेल तर अनुभव देखील गरजेचे असते. आपला आत्मविश्वास दांडगा असायला हवा. पण त्याबरोबरच विश्वास ठेवणं सुद्धा फार गरजेचं असतं. विश्वासाने पर्वत सुद्धा हलवता येतो म्हणतात. नेतृत्व कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं नव्हे तर ते समूहाचं करायचं असतं. त्यामुळे सामाजिक आणि नैतिक लक्ष्मण रेषेचं भान ठेवणं गरजेचं असतं. वरील सर्व गुण नेतृत्व करणाऱ्याकडे असायला हवेत. हे कोणा एकाकडे असतात का?
तसे पाहता नेतृत्व हे एक नैसर्गिक कौशल्य आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणतेही काम करताना जर आपण स्वतःहून काम करण्याची प्रवृत्ती अंगी बाळगली तर तो यशस्वी तर होतोच पण आनंदी राहू शकतो. नेता हा लोकांच्या मागून चालणारा असेल तरच तो लोकांच्या पुढे उभा राहतो तेव्हा नेतृत्व करण्यात सफल ठरतो. राजकारणात असणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि सरकारी किंवा कोणत्याही अधिकारी यांच्याकडे नेतृत्व क्षमता असते. अर्थात हा तुलनात्मक स्वरूपाचा गुणं आहे.
भिडस्त स्वभाव नेतृत्व करणाऱ्याला कधीच साथ देणार नाही. इथे स्पष्टवक्तेपणा तर हवाच. पण तो दाखवताना भावनांचा विचार आणि आदर करण्याचाही विचार व्हायला हवा. नेतृत्व करणारा फक्त आपल्या समूहाला चालना देत नसून तो स्वतः देखील प्रेरणा देत असतो व सहकाऱ्यांना किंवा गटाला कामाची स्फूर्ती देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. यश मिळवून देण्यात सहकार्य करणं ही त्याची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य असते. कोणत्याही सामूहिक कामात संस्थेत कार्यालयास संस्थेस तेव्हाच यश मिळते जेव्हा नेतृत्व करणारा खंबीर असतो. नेतृत्व हे उसनं मिळत नाही म्हणतात, ते निर्माण करावे लागतं. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगड विटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस होऊ शकतो.
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर
=====