
नागपुरातील बेसा-बेलतरोडी व पिपळा घोगली ग्राम पंचायत बरखास्त
_बेसा -पिपळा नगरपंचायत म्हणून नव्याने ओळख_
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या उप सचिवांच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील बेसा-बेलतरोडी व पिपळा, घोगली या ग्रामपंचायत शुक्रवार २० जानेवारी २०२३ पासून बरखास्त करून येथे नगर पंचायत मध्ये रूपांतर केल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
नागपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेसा-बेलतरोडी व पिपळा घोगली या दोन्ही ग्राम पंचायतची लोकसंख्या एक लाखाच्या जवळपास असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मिळणाऱ्या निधीतून क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या गांवाचा विकास करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अनेक अडचणी निर्माण येत असल्याने प्रशासनाला गांवाचा सर्वांगीण विकास करता येत नव्हता. म्हणून स्थानिक प्रशासनाने २६ जानेवारी २०१९ रोजी शासनाकडे संबंधित ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर पंचायत मध्ये करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येऊन सातत्याने पाठ पुरावा करण्यात आला होता.
महाराष्ट्र नगर विकास विभागाने बेसा-पिपळा या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातील नरहरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमनात्मक क्षेत्र म्हणून बेसा-पिपळा नगर पंचायत म्हणून गठीत केली असून ग्राम पंचायत बरखास्त करून नगर पंचायतीची रीतसर रचना होइपर्यंत उक्त नगर पंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी वानाडोंगरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची प्रशासन म्हणून नियुक्त केली आहे.
बेसा-पिपळा नगर पंचायत केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांचे पिपळा घोगली गटग्रामपंचायतचे सरपंच नरेश भोयर, उपसरपंच प्रभु भेंडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन व आभार मानले. बेसा बेलतरोडी, पिपळा घोगली व परिसरातील गावाला एक विकासाची नवी दिशा देण्याचे काम शासनाकडून करण्यात आले असल्याची प्रतिक्रीया सरपंच नरेश भोयर यांनी व्यक्त केली.