
एकनाथ शिंदेंसह राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?
_आजच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लागलं लक्ष_
मुबंई- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज मुंबईतील विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे.
विशेष म्हणजे आज बाळासाहेब ठाकरे यांची ९७वी जयंती असून तैलचित्र अनावरण सोहळ्याला अनेक राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे आमंत्रण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
*हा विधिमंडळाचा कार्यक्रम- राहुल नार्वेकर*
हा विधिमंडळाचा कार्यक्रम आहे. राज्यातील २८८ विधानसभा आमदार, ७८ विधान परिषदेचे आमदार यांच्यावतीने हा कार्यक्रम होतोय. याचा अर्थ अखंड महाराष्ट्राकडून होणाऱ्या या कार्यक्रमावर राजकीय आरोप करून कुठेतरी या कार्यक्रमाची उंची कमी करताय हे करणे योग्य नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन बाळासाहेबांना मानवंदना देऊया असंही ते म्हणाले.