‘आमची सहल’: अनिता व्यवहारे

‘आमची सहल’: अनिता व्यवहारे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सहज सुलभतेने उच्चारला जाणारा शब्द म्हणजे ‘सहल..!’
सहल म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणी, आप्तेष्ट यांच्यासोबत मनोरंजनार्थ मारलेला फेरफटका. यातून मिळणाऱ्या आनंदाचे मोल सहज तोलता येणार नाही इतके अगाध.. आणि म्हणूनच सहशालेय उपक्रमामध्ये शैक्षणिक सहल या उपक्रमाचा समावेश झाला असावा. प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीचा आकर्षण. पण गेली तीन-चार वर्ष कोरोनामुळे या उपक्रमावर निर्बंध आला. यावर्षी पुन्हा सहली काढण्यास हरकत नाही. “इति शासन आदेश…!” आणि त्या दृष्टीने शाळा तयारीला लागल्या. अचानक डिसेंबर मध्ये पुन्हा चीनमध्ये कोरोना अवतरला. आपल्या पाल्याला सहलीला पाठवायला तयार झालेले पालक पुन्हा द्विधा अवस्थेत. त्यांना convinc करता करता शिक्षकांच्या नाकी नऊ आले.

तसेही मोठी मुले सहज तयार होतात. पण छोट्या मुलांच्या पालकांना तयार करताना सर्वस्वी जबाबदारी स्वीकारण्याची हमी त्यांना द्यावी लागते.. त्यात “एकुलता एक” “तो आम्हाला सोडून कुठे राहिलेला नाही” वगैरे न येण्याची कारणे. त्याला संदर्भासह स्पष्टीकरण देत आमची ही सहल “देवगड -दौलताबाद किल्ला, भद्रा मारुती वेरूळ आणि औरंगाबाद दर्शन” या प्रमाणे जायचे ठरले. बुधवारी पहाटे 4:00 वाजता विद्यालयासमोरील श्री गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही सहलीचा श्रीगणेशा केला. पहिले ठिकाण नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड. हे पवित्र क्षेत्र म्हणजे “भूलोका वरील स्वर्गच जणू”. प.प. श्री किसनगिरी महाराज यांनी स्थापन केलेले ही सर्वांग सुंदर मंदिर. मंदिराची वास्तू अतिशय देखणी.. राजस्थानातून आणलेल्या संगमरवरी दगडात पूर्ण बांधकाम केलेले हे मंदिर. येथील सर्वांग सुंदर प्रसन्न दत्त मूर्ती हे खास आकर्षण. मंगलमय पवित्र स्पंदनाने भारावलेला परिसर.. दत्त मंदिराच्या बाजूस श्री किसनगिरी महाराजांची समाधी, मारुती, शनि महाराज, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर पार्वती, गणेश व कार्तिक स्वामी ही सर्व मंदिरे. गोपूरांनी नटलेला हा परिसर. मनोभावे येथे दर्शन घेऊन “क्षणभराचा ठेवा आयुष्यभर स्मरणात ठेवण्यासाठी” फोटो काढून पुढील आकर्षणाकडे वळलो खरं. पण मन मागे धाव घेत होते. यानंतर “महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला , औरंगाबाद पासून अवघ्या 15 कि.मीवर असणारा 12व्या शतकातील देवगिरी( दौलताबाद)चा त्रिकोणी ऐतिहासिक किल्ला..”

भारतीय इतिहास वर्णन करणाऱ्या असंख्य ऐतिहासिक स्थळांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक पर्यटक या किल्ल्यावर येत असतात त्यातले एक आम्ही. अगदी प्रसन्न मनानं, मोठ्या उत्साहाने शिवरायांनी गड सर करावा तसे हे आमचे छोटे छोटे आधुनिक मावळे “हर हर महादेव”, ” जय भवानी जय शिवाजी” घोषणा देत मोठ्या दिमाखात किल्ला चढू लागले. निम्म्या रस्त्यात जेव्हा दमछाक होऊ लागली, तेव्हा शिक्षकी पेशात आणि गाईडच्या जोशात आमच्या शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन देताच. मुले पुन्हा उत्साहाने किल्ला चढू लागले. अखेर अटकेपार झेंडा रोवावा आणि आनंदाची कारंजी थुईथुई नाचावी तसे किल्ल्याच्या शेवटच्या ठिकाणी गेल्यावर झाले. मुलांचा थकवा पळून गेला.. जणू काही आम्हीच गड जिंकला या अविर्भावात कधी किल्ल्याच्या पायथ्याशी आलो तेच कळलं नाही.

मन थकली नव्हती, पण थकलेल्या शरीराला पुढे नेण्यासाठी पोटाला रिकाम ठेवायला नको म्हणून येथेच गरमागरम पुरी भाजीवर ताव मारून गोल मटोल होत आमची स्वारी निघाली. खुलताबाद येथील शयन अवस्थेतील नवसाला पावणाऱ्या भद्रा मारुती मंदिराकडे. याची पौराणिक कथा अशी की, रामभक्त भद्रसेन राजा भद्र कुंडाजवळ श्रीरामांचे भजन कीर्तन करीत आराधना करताना तेथून हनुमान चालले होते ते तिथेच शयन मुद्रेत लीन होऊन भजन ऐकू लागले. शेवटी राजाने त्यांना तिथे राहण्याची विनंती केली. आणि श्री हनुमान तथास्तु म्हणून तेथेच अंतर्धान पावले.. त्यावेळेस त्यांची मुद्रा असलेली शिळा तयार झाली. तेच हे मंदिर.. जय हनुमान असा जयघोष करीत आमची सहल पुढे निघाली… बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक आणि सर्वात लहान असलेलं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर मंदिर. 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई यांनी बांधलेले हे मंदिर पुढे शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला असे हे जगप्रसिद्ध मंदिर लाल रंगाच्या दगडात त्याचे बांधकाम केलेले असून त्याचे कोरीव नक्षीकाम पाहून अक्षरशः त्या कारागिरीला हात जोडले जातात..
या नंतर आम्ही पुढे वेरूळ लेण्या कडे निघालो… तेथील अनुभव पुढील भागात….!.
(क्रमश:)

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles