
आर्जव
सागरलाटा धावत येती
किनाऱ्या भेटण्याला
अडवी वारा भाग पाडतो
परत लोटण्याला
किती काळ तिष्ठत राही
किनारा मीलनाला
पुनरपि लाटा धाव घेती
किनारी मिटण्याला
आर्जव तरी किती करावे
मनास उमगत नाही
अचल मी साद घालतो
त्यांस समजत नाही
वेल्हाळ या लाटा उसळती
अधिर जाहल्या मनी
कवेत घेण्या आतुरसा
दाटली असोशी मनी
पूर्तता कधी प्रतिक्षेची
आर्त आर्त उर्मी
अनंतकाळ वाट पाहीन
वचनची दिधले मी
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हाः सांगली.
======