
लाडकी लेक
लेक मायेची पाखरं
लेक दुधात साखरं…
लेक दूरदेशी गेली
लेक ओवी जात्यातली…
लेकी विणा सुने सारे
लेक जाता उभे वारे…
लेक माठातलं पाणी
लेक मधाळ ती वाणी…
लेक अंगणीची जाई
लेक आईचीही आई…
लेक पुनव चांदणं
लेक कपाळी गोंदणं…
लेक आठवांचा पूर
लेक हृदयी हुरहुरं…
लेक परक्याचे धनं
लेक वज्रापरी मनं…
लेक बेसनाची वडी
लेक पैठणीची घडी…
लेक अमृत गोडवा
लेक गुढीचा पाडवा…
लेक खपलीचा गहू
लेक लोण्याहुणी मऊ…
लेक दिव्यातली वातं
लेक गवताचं पातं…
लेकी विणा सुनं जगं
लेक पावसाळी ढगं…
लेक आंब्याचा मोहरं
लेक सुगीचे वावरं…
लेक श्रावणाची सरी
लेक तुळस ती दारी…
लेक अंतरीचे बोलं
लेक दर्याहुनी खोलं…
लेक लक्ष्मीचं रूप
लेक लोणकढी तूपं…
लेक पाऊस वळवाचा
लेक थेंब आळवाचा…
लेक माहेरचा मानं
लेक सासरची शानं…
लेक समईची ज्योती
लेक शिंपल्याचा मोती…
लेक सकाळचे ऊनं
लेक संगीताची धूनं…
लेक स्वप्न जागेपणी
लेक जन्मताच गुणी…
लेक मायेची शिदोरी
लेक जन्मावी उदरी…
डॉ.ज्ञानेश्वर माशाळकर, उस्मानाबाद