
प्रीत तराणे
तुझ्या आठवांचा सडा सांडला
ओढ भेटीची लागली पारव्याला,
किती समजावू भाबड्या मनाला
आठवांचा मनी खेळ हा रंगला..!!१!!
मनी गुंजती हे प्रीत तराणे
नको सांगू सारे वेडे बहाणे,
किती जीवघेणे वाट मी पहाणे
गाशील कधी प्रीतीचे गोड गाणे..!!२!!
निशा भाववेडी असे सोबतीला
नयनात या आसवे संगतीला,
किती आठवू, साठवू तव छबीला
मनी कधीचा रास मी मांडला..!!३!!
मी वेडी धरा पाहते तव वाटुली
नभा रे मनी या तव आस जागली,
भेटीची आपल्या किती स्वप्ने पाहिली
अनावर आता ओढ ती जागली..!!४!!
नको बंधने ही बेगडी नीतीची
शपथ ही ओली एक प्रीतीची,
रंगात तव रंगले मी रे कधीची
घेशील मजला कधी रे उराशी..!!५!!
प्रीतीचा रंग अजून किती ओला
हातावरी मेंदीचा रंग ही लाजला,
स्वप्ने अधीर आणि धीर ही सुटला
आसक्त मी रे तव दर्शनाला…!!६!!
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली, दीव दमण