
विद्यार्थी घडविणे शिक्षकाचे काम: आल्हाद भांडारकर
जिल्हा प्रतिनिधी, भंडारा
पालांदूर – ‘चांगले संस्कार करणाऱ्या शाळांची संख्या कमी असून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे काम शिक्षकाचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी केले. ते पालांदूर येथील गोविंद प्राथमिक व गोविंद कॉन्व्हेंट येथे आयोजित हिरक महोत्सवी स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य शिवलाल रहांगडाले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दै. पुण्य नगरी भंडारा जिल्हा प्रतिनिधी संदीप नंदनवार, सरपंच लता कापसे, उपसरपंच पंकज रामटेके, प्राचार्य गोवर्धन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भांडारकर पुढे म्हणाले की, शिक्षण हेच प्रगतीचे पाऊल आहे. म्हणून पालकांनी आपले पाल्य बाहेरगावी किंवा इतरत्र कुठेही न पाठविता आपल्या गावच्याच शाळेत पाठवावे असे पालकांना संबोधित केले. तसेच सरपंच लता कापसे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालक व शिक्षक देवांचीही सारखी भूमिका असली पाहिजे असे सांगितले तर रहांगडाले यांनी शिक्षक जिज्ञासू,अभ्यासू व सेवेशी प्रामाणिक असेल तर शाळेची प्राती झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या मनोगतातून सांगितले.
याबरोबर पाहुण्यांच्या हस्ते ज्यांनी शाळेसाठी योगदान दिले असे माजी सरपंच स्व. मुरलीधर नंदनवार यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक अंबादास धकाते यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थी प्रतिनिधी साहिल बडोले याने आहवाल वाचन केले. लेझीम पथकाद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संचालन अश्विनी कांबळे यांनी केले तर आभार लुटे यांनी मानले.