
माता रमाई
झिजली चंदनासम
तिळतिळ माता रमाई
आपण खातो या सारे
तिच्या श्रमाची कमाई
भ्रताराच्या सुखासाठी
माय गोवऱ्या वेचते
चिल्लीपिल्ली प्रेमाने
दोन घास भरवते
पै पै जोडूनिया रमा
सावरे भीमाचा संसार
दूरदेशी शिक्षणाचा
भार्या उचलते भार
नव्हता गाठीला पैसा
लेकरांचे आजारपण
पैशाविना गमावले पोर
तरी नाही लाचारपण
माय खंगली क्षयाने
तरीही काळजी भीमाची
किती सांगावी थोरवी
माय माऊली रमाची
सविता धमगाये,नागपूर