
‘मनातील भावभावना या स्वरसाजातून प्रगट होतात’; वृंदा करमरकर
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण_
खरंच सुरांमध्ये जी ताकद असते ती अलौकिक आहे. विश्वाचा आदिमस्वर ‘ओंकार’ आहे. त्यामुळेच विश्वाच्या अणू रेणूत, कणाकणांत ओंकार भरलेला आहे. सुरांचं आणि या चराचर सृष्टीचं नातं अगदी दृढ असं आहे. कारण या सृष्टीत स्वर आणि स्वरांचा झंकार भरलेलाआहे. झऱ्यांचा झुळझुळ नाद, पानांचं सळसळणं, पक्षांचं पंख फडफडणं आणि पक्षांचा मधुरव यात संगीतच तर भरलेलं असतं.
सुरांचं आणि शब्दांचं एक अलौकिक असं बंधन असतं. मनातील भावभावना या स्वरसाजातून प्रगट होतात. सप्तस्वर जेंव्हा एका विशिष्ट क्रमानं एकत्रित येतात; तेंव्हाच संगीतातील रागांची निर्मिती होते. झंकारित स्वर कानावर येताच मनातील आनंद, दुःख, आर्तता, व्याकुळता व्यक्त होतात. जेंव्हा सूर छेडले जातात तेंव्हा त्यातून राग- रागिणी, विराणी निर्माण होते. त्यातूनच साहित्यातील नवरस जसे शृंगार, वीर , करुण अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रुद्र आणि शांत रस प्रगट होतात. ‘सूर हे दु:खी मनात प्राण आणतात, संगीता शिवाय जीवन अधुरं आहे’, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
माणसाच्या मनात जेव्हा भावनिक कल्लोळ माजलेला असतो, त्या वेळेला जर तो एखादं वाद्य वाजवत असेल किंवा गीत गात असेल तर ते गीत ते संगीत मनाला अगदी खोलवर भिडतं. कधी प्रियतमाच्या भेटीनं अत्यंत आनंद होतो; तर कधी प्रिय व्यक्तीच्या विरहानं मन कासावीस होतं, कधी भक्तीच्या भावविव्हळ अवस्थेत तल्लीन होऊन एकतारीवर एखादं भजन म्हटलं जातं, तेव्हा भाव भावनांचं जे संमिश्र रसायन तयार होतं ते अजब असतं. मला या पार्श्वभूमीवर प्रकर्षानं एक गीत आठवलं. सुधीर फडके यांच्या स्वरातील “स्वर आले दुरूनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी” हे गीत आठवलं. विरहात मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले,’तसेच संजीवन मिळता आशेचे , निमिषात पुन्हा जग सावरले” अशा काहीशा त्या ओळी आहेत.
मराठीचे शिलेदार समूहात बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘सूर तेच छेडिता’ हा विषय दिला, तो अतिशय अर्थपूर्ण असा आहे. वरवर साधा असणारा हा विषय खूप मोठ्या गर्भित अर्थाने परिपूर्ण असा आहे. केवळ सतारीवर किंवा एखाद्या वाद्यावर एखादी संगीताची लकेर छेडली की सुंदर गीत निर्माण होतं. एवढंच नाही तर असं गीत, संगीत कानावर पडताच निर्माण होतं असंच नाही तर त्या गीता बरोबर जोडलेल्या त जोडलेल्या अनेक भावनांचं दर्शन त्यावेळी होतं. आपलं मन म्हणजे एक ” आठव तळं” च असतं. आठव तळ्यात किती आठवणी, किती स्मृती अगदी दाटून वसलेल्या असतात. असं एखादं गीत ऐकल्यानंतर गतकाळातील आठवणी मनाला व्यापून टाकतात आणि एक छानसं चित्र शिल्प डोळ्यांसमोर आकाराला येत.आपण जगलेल्या गतकाळातील क्षणांच्या मधुर आठवणी पुन्हा जाग्या करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न सुद्धा केला जातो. बघा सूर तेच छेडिता या ओळीबरोबर ह्रदय वीणेची तार झंकारली आणि मन आठवांत दंग झाले. आपल्या ‘मराठीचे शिलेदार समूहाचे’ सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर अशा विषयांतून आपल्या बुध्दीला धार देण्याचं कार्य सातत्याने करीत असतात. म्हणूनच अशा काव्यस्पर्धेत सहभाग घेण्याचा आनंद अलौकिक असा आहे. मलाही या हक्काच्या व्यासपीठावर परीक्षण लिहण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहातील सर्व परीक्षक/ सहप्रशासक, संकलक यांचे मनस्वी आभार.
वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली जिल्हाः सांगली.
परीक्षक/ कथालेखिका/ कवयित्री
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह