मायेचं वृंदावन बहरलं मनामनात…तर सौख्य समृध्दीचं दान पडेल घराघरात…!

मायेचं वृंदावन बहरलं मनामनात…तर सौख्य समृध्दीचं दान पडेल घराघरात…!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वृंदावन अर्थात तुळशीचे रोप वाढविण्यासाठी वाळू, माती आणि पाणी यांपासून तयार केलेला एक सुबक चौथरा होय. आमच्या लहानपणी स्वतःच्या हाताने अंगणात घडवलेले वृंदावन ही तर आनंदाची परिसीमा असायची. वाळू आणि माती यांना पाण्याने भिजवून हव्या त्या आकाराचे वृंदावन घडविण्यात मग्न झालेले बालपण आठवते आणि त्या ओल्या मातीचा स्पर्श आजही तनमन फुलवितो. घरासमोरील अंगणात मंद वाऱ्यावर डोलणारी तुळस आणि रंगरंगोटी केलेले वृंदावन बघून मन प्रसन्न न झाले तर नवलच. अशा या तुळशीच्या औषधी गुणधर्माने तर तिने आबालवृद्धांच्या मनात घर केलेले‌ आणि म्हणूनच कदाचित मायेचं वृंदावन शब्दांकित करताना शिलेदारांची लेखणी अंगणभर फिरत राहिली.

आज शहरातील जागेची मर्यादा, फ्लॅट संस्कृती यांमुळे झाडे वेली जोपासण्यासोबतच अंगणातील वृंदावनही आकुंचित होत गेले. पण एका कोपऱ्यात सिमेंट अथवा सिरॅमिक चे छोटेसे वृंदावन अजूनही आपले स्थान टिकवून आहे. एक परंपरा, संस्कृती जोपासण्याबरोबरच हवेचे शुद्धीकरण करून प्राणवायूचा पुरवठा करणारी, तसेच सर्दी पडसे खोकला, ताप यांसारख्या आजारांवर घरगुती औषधांमध्ये स्थान मिळवलेल्या तुळशीचे वृंदावन म्हणूनच आजतागायत लोकाभिमुख आहे.

पण आपल्या शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने दिलेला ‘मायेचं वृंदावन’ जरा वेगळा दृष्टिकोन देऊन गेला. श्रीकृष्ण आख्यायिकेमध्ये राधा आणि कृष्णाची निर्व्याज प्रीती ज्या ठिकाणी बहरली ते वृंदावन म्हणजे उत्तर भारतातील मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर. राग, लोभ, मोहाच्या पलिकडे जाऊन आपल्या कर्तव्याच्या वाटेवर चालताना प्रितीचे महत्त्व अधोरेखित करणारे हे ठिकाण आजही प्रेरक ठरते. मग ती प्रीती माय-लेक, पिता-पुत्र, पती-पत्नी अशा रक्ताच्या नात्यांसोबतच शेजारीपाजारी, आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी यांच्या मनात सुद्धा मायेचं वृंदावन बहरणं गरजेचं आहे. एका निकोप समाजजीवनासाठी तो एक आवश्यक धागा आहे, कारण ‘मायेचं वृंदावन बहरलं मनामनात…तर सौख्य समृध्दीचं दान पडेल घराघरात…!’

मराठीचे शिलेदार समूहातील शिलेदारांनी माननीय मुख्य प्रशासक श्री. राहुलदादा पाटील यांच्या विषयाला खरोखरीच आपल्या रचनांमधून न्याय दिला. पर्यावरण रक्षणासोबतच नात्यांची जपणूक करणारे तुळशी वृंदावन रेखाटतानाच आपल्या मायेचं वृंदावन कुठे कमी पडलं म्हणून पोटची मुलं विश्वासघातकी निघाली हा प्रश्नही मन हेलावून गेला.

शेवटी एकच आर्जव लिहित राहा…व्यक्त होत राहा…मायेचं वृंदावन बहरवत राहा…. सर्वांच्या भावी लेखणीस खूप खूप शुभेच्छा…!

वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका/ सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles