
“हाफ तिकीट सन्मान की, गंमत जंमत; सविता पाटील ठाकरे
लहानपणी आई सोबत मामाच्या गावाला जायची मज्जाच काही वेगळी होती. तासनतास एसटी स्टैंडवर बसून वाट पाहत बसायचे. आम्ही जाणार त्या दिवशी हमखास एस.टी.उशिराच यायची (की आम्हीच जाण्याच्या उत्सुकतेने बसच्या वेळे आधी बस स्टैंडवर पोहोचायचो) याचे कोडे अजून उलगडले नाही मला.
एकदा का बस आली, की रेटून ,खेटून कसं बसं आत बसायचं….मग सुरू व्हायची आईची अन् कंडक्टरची फुल तिकिटासाठीची जुगलबंदी… त्याचा नेहमीचाच प्रश्न…कोणत्या वर्गात आहे हो ही मुलगी???? आणि आईचं त्याला हजरजबाबी उत्तर तयारच असायचे.. दरवर्षी मी. पाचवीलाच मलाही नाही कळायचं शाळेत तर मी पास व्हायची पण बस मध्ये मात्र नेहमीच नापास.!
एकदा का हाफ तिकीट काढण्यात आई यशस्वी झाली की विजयी आविर्भावाने कुणाच्यातरी सीटवर दोघात तिसरे नाहीतर तिसऱ्यात चौथं मला बसवलं की तिच्या मातृत्वाचा मला अभिमान वाटायचा.
कसं आहे ना हो हे मानवी जीवन… परमेश्वराच्या इच्छेचे तिकीट घेऊन आपण जन्माला येतो.. सुरुवातीला विना तिकिटाचा प्रवास नंतर हाफ तिकीट एकदा का मोठे झालो की फुल टिकीट पुन्हा एकदा हाफ तिकीट आणि शेवटी परमेश्वराच्या इच्छेनेच अंतिम तिकीट घेऊन आपण आपल्या जीवन प्रवासाचे वर्तुळ पूर्ण करतो. किती छान आहे ना हे सर्व. यातला फुल तिकिटांचा अर्थात तरुणाईचा काळ मोठा गमतीदार आहे.
याच काळात मानवी जीवनाचं सार्थक करतांना नम्रतेने जग जिंकता येते. जबाबदारीने पुढे जाता येतं प्रामाणिकपणा बाळगून मोठे होता येते. आदराने दुसऱ्याला मोठे करता करता स्वतःही मोठं होता येते. कृतज्ञतेने मानवी मनात जागा निर्माण करता येते. विवेकाने जगावर मात करता येते; तर संवेदनशीलता जोपासून दगडाला पाझरही फोडता येतो.
स्री म्हणून जगताना, तर हे सर्व मी सहज करू शकते हा विश्वास आपणा सर्वांमध्ये भरणे ही आजची गरज आहे. महाराष्ट्रात महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के भाडे सुट दिली..विचार केला कुठे गरज आहे आम्हांला याची ??? यापेक्षा ग्रामीण भागातील माझ्या भगिनी डोळे फुटेपर्यंत चुल फुंकतात, संपलेलं गॅस सिलेंडर त्यांना पाहून हसते. त्याला भरण्यासाठी पैसा त्यांच्याजवळ नसतो. यावर्षी तर अवकाळी पावसाने फार कंबरडे मोडले माझ्या बळीराजाचे. त्यांना द्या ना सूट गॅस च्या किमतीत,किमान पन्नास टक्के तरी. शासनाने महिला वर्गांना हाफ तिकीटात टाकून पुरूष वर्गाचा अपमान केला की काय असे वाटते; तर महिलांचा सन्मान करून राज्यशासन गमती जमती पाहात आहे. हा संशोधनाचा विषय आहे.
आम्हाला नकोय हे, खेड्यात राहणाऱ्या त्या भगिनीच्या हाताला काम द्या…कष्टाळू आहेच मुळात ती. तिला स्वयंभू बनवण्याचे पुण्य पदरी पाडून घ्या.हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, ही जिजाऊंची कर्मभूमी आहे बहिणाबाईंची ज्ञानसंगिनी आहे तेव्हा इथे गरज आहे खऱ्या अर्थाने स्री सन्मानाची.! ‘हाफ तिकीट’ महिला सन्मान योजने ऐवजी स्वयंभू महिला सन्मान योजना राबवा आणि माझ्या ग्रामीण भागातील भगिनींना सक्षम करा. अन्याय,अत्याचार, असुरक्षितता हे तर त्यांच्या पाचविलाच पुजलेले आहे.त्यातून बाहेर काढा ना त्यांना.
गेल्या काही दिवसापासून हाफ तिकीट या विषयावर मतेमतांतरे ह्या महाराष्ट्राने पाहिलीत. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर नेहमी लेखणी आणि प्राप्त परिस्थितीची सांगड घालतात तेव्हाच तर आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत हाफ तिकीट हा विषय देऊन त्यांनी कवी कवयित्रींच्या मनातले भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
परीक्षणार्थ रचनांचे अवलोकन करताना एक गोष्ट विशेष पाहावयास मिळाली ती म्हणजे जवळपास सर्वच कवी कवयित्रींनी एसटी बस भाड्यात मिळालेली सूट शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला मी नेहमीच सांगते की घाटणी पेक्षा वेगळं काहीतरी केलं तर ते रसिकांच्या मनाला नक्कीच भावतं,आणि आपलं वेगळं पण यातूनच सिद्ध होते. असो.. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील काव्य प्रवासास अनेक अनेक शुभेच्छा…!!
पण थोडे काही. कवी म्हणून स्वतःची शैली विकसित करा, कारण आशय आणि शैली रक्तमांसा सारख्या परस्परात गुंतलेल्या असतात. काव्य सृष्टीला सजवतं,डोळ्यांना सुख देतं, आणि रुक्ष माळरानांना आपल्या रंगाने अवर्णनीय शोभा आणतं.अनुभवांना कलेचा ,प्रतिभेचा परिस्पर्श द्या मग तुमचे काव्य फुलते…अन् फुललेल्या काव्यात सामान्य गोष्टींना उच्च पातळीवर नेण्याचे धैर्य असते यावर माझा विश्वास आहे.
सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, लेखिका, कवयित्री