
शांतीचा मार्ग
शांतीचा मार्ग कर स्वीकार
होईल मग तुझाही उध्दार..
प्रेमाने जग जिंकता येते
मनःशांतीचे उघडता द्वार…
कर विपश्यना,ध्यान चिंतन
काबूत राहील हे स्वैर मन..
क्रोध,लोभ,मोह,माया,मत्सर
त्यातून न्हाऊन निघेल तन….
तू शांतीचा मार्ग अनुसरावा
तथागताचा पाईक होऊन..
जिवन तुझे सत्कर्मी लागेल
घेशील जेव्हां मूल्ये रुजवून…
बोलण्यापेक्षा अबोला बरा
शाब्दिक हिंसा ही न व्हावी..
वाणी अशी बाहेर पडावी
माणसाची मने जुळून यावी…
आदरभाव जागवा मनोमन
सलोखा राखावा धरणीवर..
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे सर्वांनी
आपल्या कथनी करणीवर …
सर्व धर्म समभाव माणूनी
एकोप्याने राहोत इथे सर्व..
विरून जावे हेवेदावे अन्
मानवा तुझा मनाचा गर्व…
बी एस गायकवाड
पालम,परभणी