
तालुका सहायक निबंधकास २० लाखाची लाच घेतांना रंगेहाथ अटक
_वरिष्ठ लिपीकालाही ठोकल्या बेठ्या_
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गेल्या काही वर्षातील मोठी कारवाई केली असून तालुका सहायक निबंधकास तब्बल २० लाखाची लाच घेताना आज (ता.२९) रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, या लाचखोरीत तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग होता. त्यामुळे सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने रात्री उशिरा ताब्यात घेतले.
‘एसीबी’ तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव रणजित पाटील असे आहे. सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपिक प्रवीण अर्जुन विरनारायण याचाही सहभाग होता. या संदर्भात एसीबीकडे तक्रार आली.
त्यानंतर एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रात्री सापळा रचला. सापळ्यात लाचखोर निबंधक पाटील आणि लिपिक वीरनारायण यांना २० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नाशिक शहरात खासगी सावकारीने उच्छाद मांडला आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपूरच्या अशोक नगर परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांनी आपले जीवन संपविले आहे. त्यानंतर पोलिसांनी तब्बल २० सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच सहकार विभागानेही सावकारांविरुद्ध मोहिम उघडली आहे. आता या मोहिमेअंतर्गतच कारवाई न करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहाय्यक यांना रंगेहाथ पकडले.