
खरच का सखी तू
सखी, खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
वाचले, ऐकले पुराणात आम्ही
गार्गी,मैत्रयीसारख्या विदूषींना
तू शिकून सवरून सुद्धा
विचारांची गुलाम आहेस
सखी,खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
अभ्यासले, वाचले इतिहासात आम्ही
पहिली स्त्री शासक रझिया सुलतानांना
आज शासन सांभाळतांना नाव फक्त तुझे
कारभार पुरूषच हाकत आहेत
सखी, खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
घोडा तटावरून सोडणारी
झाशीची राणी आम्ही अभ्यासतो
उंबरठा ओलांडण्याचे स्वातंत्र्य
खरच का तू उपभोगत आहेस
सखी, खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
जिजाऊंना आम्ही पुजतो
पाटलांची खंडाळी करणाऱ्या शिवबासही ओळखतो
चिमुकल्यांचे स्त्रीत्व इथे नासते
आज पावलापावलावर तू असुरक्षित आहेस
सखी, खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
विधवा पुनर्विवाह,सतीप्रथेविरूद्ध लढणाऱ्या
अहिल्याराणीचे वंशज आम्ही
कितीतरी समाजविघातक रूढींमध्ये पिसतेस
नयनी अश्रू ओठी आक्रंदन लपवून तू जगत आहेस
सखी, खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
कल्पना चावलाच्या अंतराळातील उड्डाणासोबत
आपल्या कल्पनांनाही तू उड्डाण देतेस
भविष्याबद्दल स्वतःच्या कितीतरी स्वप्ने रंगवतेस
खरच तुला वाटते का,तू स्वातंत्र्यात जगते आहेस?
सखी, खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
सखी,माझा मलाही प्रश्न आहे
सखी, माझा तुलाही प्रश्न आहे
संकुचित समाजविचारात जगतेस
मनातच फक्त विद्रोहाने पेटतेस
तसे पेटून बोलण्याचे तरी धाडस, का तू कधी केले आहेस?
सखी, खरच का तू
बंधनातून मुक्त आहेस?
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड