
नवीन मराठी शाळेच्या ईमारतीची शतकपूर्ती
_नेत्रदीपक दीपोत्सवाने उजळून निघाली वास्तू_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ‘नवीन मराठी शाळा’ सर्वश्रुत असून पुण्यात भर शनिवार पेठेतला या शाळेची प्रशस्त जागा आणि जुन्या पध्दतीची कमानदार दगडी ईमारत लक्ष वेधून घेते. याच आकर्षक दगडी इमारतीच्या निर्मितीस या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच या शाळेच्या स्थापनेचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. हाच दुहेरी सुवर्णयोग साधून शाळेच्या ईमारतीस मनमोहक रोषणाईने सजवण्यात आले होते.
सुप्रसिद्ध स्थापत्यशास्त्र विशारद श्री. रवींद्र रानडे हे प्रमुख अतिथी म्हणून या दीपोत्सव कार्यक्रमास
लाभले होते. तसेच ज्येष्ठ उद्योजक ज्योती प्रकाश सराफ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेचा इतिहास लिहीण्याचे काम हाती घेतलेल्या अहिल्यादेवी हायस्कूलच्या माजी शिक्षिका, श्रीमती अद्वैता उमराणीकर यांना खास आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. सरस्वती पूजन, इमारतीचे पूजन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपोत्सवाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना वाघ यांनी प्रास्ताविक मांडले. शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख सांगून त्यांनी येणाऱ्या काळातली आव्हाने ओळखून शाळेने आखलेले भविष्यातील प्रस्तावित प्रकल्प याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली.
इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे या संस्थापकांच्या वेशभूषेत आपले मनोगत व्यक्त केले.
भाग्यश्री हजारे यांनी प्रमुख अतिथी रवींद्र रानडे यांची मुलाखत घेतली, त्यातून पुरातन वास्तूंची वैशिष्ट्ये व ईतिहास,एखादया वास्तूला ‘वारसास्थळ’ हा दर्जा मिळण्याची प्रक्रिया या गोष्टींची सविस्तर माहिती यातून उलगडत गेली.
सन १९९१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यांनी शाळेला ११ संगणक व एक मोठा प्रिंटर भेट दिला.
दीपोत्सव या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या शिक्षिकांनी ‘नमो भास्करा दे अनोखा प्रकाश’ या गीतावर दीपनृत्य सादर केले.
अर्चना देव यांनी आभार मानले. प्रिया इंदुलकर यांनी अतिथी परिचय करून दिला. शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे यांचे कार्यक्रम संकल्पना व नियोजनास मार्गदर्शन लाभले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधक डॉक्टर सविता केळकर, डॉ.शरद आगरखेडकर, ॲड. राजश्री ठकार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.