
भीम जयंती
जयंती भीमाची येताच
आनंदाला उधाण येते,
हर्ष मनी मावत नाही
चैतन्याचे वारे संचारते.
मायबापा पेक्षाही श्रेष्ठ नाते
माझ्या बाबासाहेबांचे वाटते,
जयभीम स्वर उच्चारताच
अंतःकरण गर्वाने फुलून येते.
पडेल,सारा जन्मही अपुरा
उपकाराची परतफेड करण्यात,
नांव कोरलेय, माझ्या बाबांचे
मुखीच्या घासात, अन् श्वासात ,
डॉ. आंबेडकर कोहिनूर हिरा
चमकतो साऱ्या विश्वात,
त्यांच्या ज्ञानप्रकाशाची ओळख
झाली साऱ्या जनामनात.
मूकनायक नाव ज्यांचे
सर्व शोषितांचे कैवारी,
अन्यायाच्या प्रतिकारची
रीत हीं त्यांची, न्यारी.
माहेराला येती लेकीबाली
भीम जयंती सणाला,
राहत नाही पारावार
त्यांच्या हर्ष,आनंदाला.
मुर्दाड होतो आम्ही
जागृत केले आम्हाला,
ज्ञानाचे अमृत पाजून
जिवंत केले सा-याना.
पुस्तकं वाचायची शिकायची
मुभा नव्हती आम्हाला,
संविधान लिहून भारत देशाचे
इतिहास नवा घडविला.
करू साजरी जयंती आता
सारे आम्ही वाजत गाजत
संघटित होऊ आम्ही सारे
ज्ञानाचा वारसा वाढवू शिक्षण घेत.
ज्ञानाची ओळख नाव ज्यांचे
करीतो आम्ही त्यांना वंदन,
पुस्तकांशी मैत्री करून
फूलवू विचारांचे नंदनवन.
स्वाभिमानाचे जगणे
भीमा, तुझ्यामुळे मिळाले,
गुलामगिरीचीं श्रृंखला तोडून
आज,वैचारिक स्वातंत्र्य मिळाले.
मायादेवी गायकवाड
मानवत, परभणी
======