
देवरस रूग्णालयाचे भूमिपूजन अक्षयतृतियेला
_सामान्यांना परवडेल अशा वैद्यकीय सेवेची ग्वाही_
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: सर्वसामान्य व गरीब लोकांना परवडेल अशा वैद्यकीय सेवेची ग्वाही देणारे आणि आवाक्यात येतील अशा खर्चात गुणवत्तापूर्ण आधुनिक वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, ‘ पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान’ यांच्या वतीने”बाळासाहेब देवरस रूग्णालय” ऊभारण्यात येत असून त्याचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दि.२२ एप्रिल २०२३ रोजी अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे.
कात्रज भागात, खडी मशीन चौकाजवळ हे रूग्णालय ऊभे राहणार असून कमीत कमक ८०० बेड असलेली ही वैद्यकीय सेवा दोन टप्प्यात आकाराला येईल, सुसज्ज रूग्णालय व अद्ययावत वास्तुच्या भूमिपूजना हा समारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सकाळी १०.३० वाजता होणार आहे, अशी माहिती बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिकचे अध्यक्ष श्री. शिरीष देशपांडे आणि कार्यवाह बद्रीनाथ मूर्ती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
भूमिपूजनाच्या या समारंभाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसूख मांडवीय, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी,पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे मानद अध्यक्ष तसेच राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पूज्य. गोविंद देव गिरी महाराज, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदर पूनावाला ईत्यादी मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.
श्रद्धेय बाळासाहेब देवरस हे आणीबाणीतील काही वर्षे पुण्याला येरवडा तुरूंगात होते. शेवटची काही वर्षे मित्रमंडळ चौकातल्या कौशिक आश्रमात त्यांचा निवास होता. सेवा धर्माची शिकवण देणा-या बाळासाहेब देवरस यांचे नाव ऋग्णालयाला देण्याचे हे औचित्य लक्षात घेऊन प्रतिष्ठानने हे नाव निश्चित केले.
पुण्यातील तज्ज्ञ व मान्यवर डॉक्टरांच्या टीम या प्रकल्पासाठी कार्यरत होणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्णालय उपचार सुविधांचे सविस्तर नियोजन होते आहे.त्याचप्रमाणे ईमारत ऊभारणी प्रकल्पासाठी मान्यवर आर्किटेक्ट आणि बांधकाम व्यावसायिकांची नेमणुक करण्यात आली आहे.
येत्या दोन वर्षात, म्हणजे २०२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असताना या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रतिष्ठानचा प्रयास आहे.