‘मृत्यूचे उन्हाळी सापळे’; डॉ अनिल पावशेकर

‘मृत्यूचे उन्हाळी सापळे’; डॉ अनिल पावशेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार ओळखला जातो. १९९५ ला भाजप सेना युती सरकारने याची मुहुर्तमेढ रोवली होती. दरवर्षी साहित्य, कला,खेळ, विज्ञान यासोबतच सामाजिक कार्य, पत्रकारिता, लोक प्रशासन आणि स्वास्थ्य सेवा या क्षेत्रात उत्कृष्ट वैयक्तिक उपलब्धीसाठी हा पुरस्कार दिला जातो. १९९६ ला सर्वात प्रथम हा पुरस्कार पु.लं. देशपांडे यांना देण्यात आला होता. यावर्षी हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल श्रीयुत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. मात्र यावेळी या पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्रीसाधकांच्या दुर्दैवी मृत्यूने गालबोट लागले असून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या बळींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

झाले काय तर सध्या सगळीकडे भव्य दिव्यतेची चढाओढ लागली आहे. एखादा कार्यक्रम किती मोठा, किती गर्दीचा यावरुन त्याच्या यशाचे मोजमाप ठरू लागले आहे. प्रत्येक कार्यक्रमाचा जणूकाही इव्हेंट करून टाकला आहे. मग ते मंत्र्यासंत्र्यांचे शपथविधी असो, की सरकार स्थापन करणे असो अथवा एखादा पुरस्कार सोहळा असो. खरेतर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा पुरस्कार राष्ट्रपती भवनात मोजक्या निमंत्रीत पाहुण्यांत पार पाडला जातो तर मग महाराष्ट्र भूषण सोहळा राजभवनात आयोजित केला असता तर काय बिघडले असते? फारतर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करून सर्वांना घरबसल्या पाहता आले असते. मात्र एवढ्या गर्दीचा अट्टाहास कशासाठी केला गेला हा चिंतेचा विषय आहे.

एकतर हा सोहळा ऐन एप्रिल महिन्यात आयोजित केला गेला आणि तो सुद्धा दुपारच्या वेळी. त्यातल्या त्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव नसलेल्या मर्जीतील कंपनीला चक्क १४ कोटीचा कॉन्ट्रँक्ट देण्यात आला. खरी गफलत इथेच झाली. जर सोहळा दुपारी करायचा होता तर त्यादृष्टीने इनडोअर स्टेडियम, बंदीस्त सभागृह हा पर्याय योग्य ठरला असता. अथवा मोकळ्या मैदानातच जर घ्यायचा होता तर त्यादृष्टीने आयोजकांनी सोहळ्याची वेळ सकाळी अथवा सायंकाळची ठेवली असती तर पुढील अनर्थ टळला असता. शिवाय जर सोहळा दुपारी उशीरापर्यंत चालण्याची शक्यता होती तर मंडप, कनाती, कमानी, संरक्षक शेड आणि यासारख्या उन्हापासून संरक्षण देणाऱ्या बाबींची उपाययोजना करायला हवी होती.

अर्थातच आयोजकांनी त्यांच्यातर्फे येणाऱ्या लोकांसाठी ताक पाणी सरबत आणि खाद्यपदार्थांची सोय केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एप्रिलच्या उन्हाचे काय? सतत तीन चार तास कडक उन्हात बसल्याने जी हानी झाली तिच पुढे चौदा बळी आणि जवळपास पन्नास व्यक्तींना रुग्णालयात भरती होण्यासाठी कारणीभूत ठरली. शिवाय त्यादिवशी अचानक तापमान वाढले ही सबब सुद्धा लंगडी ठरते. कारण एप्रिल म्हटले की कडक ऊन आलेच. नैसर्गिक कारणांना दोष देण्यापेक्षा, त्यापासून बचाव कसा करता येईल ही भुमिका घेतली असती तर निश्चितच हानी टळू शकली असती.

उष्माघाता बाबत सांगायचे झाले तर आपल्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. याच तापमानावर आपल्या शरीरातील विविध क्रिया पार पाडल्या जातात. बाहेरील तापमान वाढले तरी शरीराचे तापमान घामाद्वारे उष्णता विसर्जित करून कायम राखले जाते. मात्र या करीता सतत पाणी अथवा द्रवपदार्थ पिणे आवश्यक असते. पण तापमान सातत्याने वाढत गेले तर शरीरातील तापमान नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. रक्तदाब कमी होणे, मांसपेशी कडक होऊ लागणे, महत्वाच्या अंगांना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, विशेषतः मस्तिष्काला रक्तपुरवठा कमी होऊन व्यक्ती बेशुद्ध पडतो, महत्वाचे अंग निकामी होऊन मृत्यू ओढवतो.

निश्चितच ही घटना दुर्दैवी आहे मात्र थोडं ससंमजपणे या सोहळ्याचे नियोजन केले असते तर ही प्राणहानी नक्कीच टाळता आली असती. खरेतर या घटनेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्नच आहे. मृत आणि जखमींना आर्थिक मदत केली म्हणजे आपले दायित्व संपले अशातला हा भाग नाही. समजा हीच घटना एखाद्या खाजगी समारंभात झाली असती तर किती गजहब उडाला असता? आतापर्यंत धरपकड होऊन जबाबदार आयोजक गजाआड झाले असते, न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले असते. मात्र सध्या सर्वत्र शुकशुकाट आहे. जणुकाही सरकार दरबारी ही घटना नैसर्गिक आपत्ती होती की काय अशी शंका येते. ना कुठे कोणी नैतिकतेसाठी राजीनामा देणार ना कोणी या कृत्यासाठी तुरूंगात जाणार.

फारतर एखाद्या चौकशी आयोगाचे बुजगावणे उभे करण्यात येईल. वर्षानुवर्षे तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात ही गंभीर घटना सगळे विसरून जातील. मात्र पीडितांच्या वेदनांचे काय? कोण त्यांना न्याय मिळवून देईल? कोण त्यांच्या जखमांवर फुंकर घालेल? प्राणांचे मोल लाखलाखांच्या आकड्यात अडकवून खरोखरच पिडीतांचे अश्रू पुसल्या जाईल काय? अर्थातच अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील ही आपली भाबडी आशा आहे. लाखांच्या पुरस्कारासाठी कोट्यावधीची उधळण करून लाखमोलांचे निष्पाप प्राण गमावणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते? शासनाने या दुर्दैवी घटनेतून धडा घेत यापुढे अशा जंगी कार्यक्रमाबाबत काही स्पष्ट नियमावली आखणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत.

सरकार, आयोजक यापलीकडे जाऊन अशा घटनांचा अभ्यास केला तर अशा प्रचंड सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यांनीही थोडे तारतम्य बाळगायला हवे. कोणाच्याही श्रद्धा, भक्तिभाव अथवा विश्वासाला तडा न देता काळवेळ पाहून आपण अशा भव्यदिव्य समारंभात सहभागी व्हायचे की नाही याचे आपण सर्वांनी भान ठेवायला हवे. विशेषत: लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यायला हवी. त्यातही जर कोणाला ह्रदयरोग, मधुमेह अथवा इतर कोणतेही गंभीर आजार असल्यास अशा कार्यक्रमांना जाऊच नये. शेवटी काय तर आपले कुटुंब आपली जबाबदारी याचा विसर पडू देऊ नये. मृत्यू अटळ आहे परंतु अपघाती मृत्यू आणि मानवी चुकांमुळे अथवा बेपर्वाई, हलगर्जीपणा, सुरक्षेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे होणारे अथवा टाळता येऊ शकणारे मृत्यू यात जमीन अस्मानचे अंतर आहे.

*********************************
दि. २० एप्रिल २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles