
‘जेव्हा…शब्दांपेक्षा, देहबोली अधिक महत्त्वाची व प्रभावी ठरते’; संग्राम कुमठेकर
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण_
‘मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर’
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभायात’
कवयित्री बहिणाबाईंनी मानवी मनाचे अचूक नि वास्तव वर्णन केलंय. परंतु अशा या मनातलं अचूक, जो ओळखतो त्याला मनकवडा म्हणतात. मन कुणाचे कधी कुणास कळलेय का ? परंतु नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा, ओलावा, जिव्हाळा निर्माण करायचा असेल, तर त्याला मनकवडा व तिला मनकवडी व्हावेच लागेल.
बागेत फिरत असताना दोघांच्या गप्पांना रंग आला होता.मनसोक्त हसणं..बोलणं चालू होतं एका जोडप्याचं. तेवढ्यात एक देखणी…अप्सराच जणू…अनेकांच्या काळजाचे ठोके वाढवित चालली होती.त्यानेही पाहिलं अन् तिनेही पाहिलं पण ती न्याहाळतच होती एकटक सारखं तिला… हे पाहून त्याने आवाज दिला,”अगं,काय पाहतेस एवढं ? ” ती भानावर येत म्हणाली,”अहो, कुठं,काय,काही नाही.” तो म्हणाला,”अगं,खरं सांग काय बघत होतीस,खोटं का बोलतेस तू ? ” ती सहज बोलून जाते,” अहो,ती बघा ना, किती देखणी हाय ? ” तो म्हणतो,”होय,खरंच खूप देखणी गं ती,अतिसुंदर…” हे ऐकताच तिचा सारा बोलण्याचा नूरच बदलतो.
तिची समजूत काढता काढता त्याची काय पंचाईत झाली आता काय सांगू ? खरतंर डोळे जग बघण्यासाठी,कान ऐकण्यासाठी,तोंड बोलण्यासाठी आहे पण काय बोलावं ? काय बघावं ? काय ऐकावं ? हे व्यक्तीपरत्वे स्वभावावर अवलंबून असते.
तीच बायको लाडात आल्यावर म्हणते,” अरे खरं सांगू का ? फक्त नि फक्त तुझ्यामुळे माझ्या जीवनाला बहर आलाय. तुझ्या शब्दांची जादू माझ्यावर अशी चढलीय की मी कायमची तुझीच झाले,तुझ्यामुळेच माझ्या मनाला पंख फुटले…त्या पंखात बळ तूच भरलेस…अरे चातक पक्षी पावसाच्या थेंबाची जशी आतुरतेने वाट पाहतो तशीच तुझ्या शब्दफुलांची मी वाट पाहते.याच मायावी शब्दांनी मला जिंकलंस तू..माझं मन तुझ्यामुळेच आनंदानं नाचतंय..गातंय…अरे मी तुझी नि तू माझा कधी झालास हे मलाही कळले नाही हे फक्त तुझ्या मनकवड्या स्वभावामुळेच…!!
मानवी संबंधांमध्ये वाद, संवाद, वादविवाद,सहज गप्पा,भांडण, चिडणे,रडणे, गोड बोलणे यातून अनेक क्रिया प्रतिक्रिया घडत असतात.पण कधी कधी शब्दांपेक्षा देहबोली अधिक महत्त्वाची व प्रभावी ठरते. त्यातून ” शब्दाविना संवादू” हे साध्य होत असतं. देहबोलीतून भावना समजून घेतल्या जातात त्यालाही काहीजण मनकवडा म्हणतात.
मुख्य प्रशासक राहुल दादांनी दिलेला “मनकवडा” हा बहुरंगी विचार करावयास लावणारा विषय. या विषयाला न्याय देत शिलेदार बंधू भगिनींनी प्रियेसीला ,आईला,बापाला,
सख्याला,सावळ्या विठ्ठलाला साद घातली आहे. विषयाला सजवले आहे.राहूल दादांनी जणू काही या विषयातून सर्वांचे गुपितच काढून घेतल्याचा भास मला झाला म्हणून ते ही मनकवडेच वाटतात.
माझ्या सत्यशोधक नजरेला असं वाटतंय जिथं सूर्याची किरणं पोहचू शकत नाहीत अशाही स्थळी पोहोचतो तो कवी. सखी, पत्नी, आई, मुलगी, सून,सासू,काकू,मावशी,सवत,आजी या सर्वच स्त्रीरूपांना तसेच मुलगा, बाप, आजोबा,पती इ.पुरूषी रूपांना अचूक हेरतो व अचूक शब्दपेरणी करतो म्हणून खरा ‘मनकवडा’ कवीच असू शकतो पण त्यासाठी शब्दगंधाची गोडी चाखण्याचा चोखंदळपणा वाचकाकडे असावा लागतो.
✍️शेवटी एवढंच सांगावसं वाटतंय की, लोक खिशातले पैसे देऊन जेव्हा पाणीपुरी विकत घेतात तेव्हा ती चाटूनपुसून खातात पण तेच लोक लग्नात भरमसाठ वाढून घेतात व पानावर तसंच ठेवतात.यामुळेच की काय राहुलदादा अत्यल्प शुल्क घेऊनच विशेष व विविध उपक्रम राबवितात.ते यासाठीच की लोकांनी समूहाला कचरापेटी समजू नये म्हणून…!! दादांनी मला परीक्षणीय लेखणीतून व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सर्व शिलेदार ताई दादांना पुढील लेखनीस मोरपंखी शुभेच्छा !!
✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*