
अवकाळी पाऊस
असा कसा पावसा
तू झालास निष्ठूर
बळीराजाच्या डोळा
आला अश्रूंचा पूर
डोळ्यासमोर गेले
वाहून सारे स्वप्न
हिरवे माळरान
झाले क्षणात भग्न
गारपिटासह तू
होता कोसळत
तोंडाशी आला घास
नेला पाण्यासोबत
काय करावं सांग
आता शेतकऱ्यांनी
पिक कसं घ्याव ते
सांग समजावूनी
थकला बळीराजा
तुझा थांग लागेना
काय तुझ्या मनात
काही केल्या कळेना
गरज नसता येतो
तू आभाळ फाडून
वाट तुझी पहाता
जाशी दडी मारून
अवकाळी पाऊस तू
तुझा ना भरवसा
नेते पुढाऱ्यां गत
तुही नसे कामाचा
तुझ्यापरि पडे येथे
आश्वासनी पाऊस
भूलथापा मारण्या
निघे सारा जुलूस
घालितो आर्त साद
तो जगाचा पोशिंदा
बळीराजावर होऊदे
तुझीच कृपा औंदा
अर्चना सरोदे
सिलवास,दादरा नगर हवेली