
‘विस्कटलेली घडी बसवायला विश्वासाची नितांत गरज’; सविता पाटील ठाकरे
_ बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
ऐकतोस ना…!! अरे समीर, कसे हे स्विकारू मी? सांग मला. तुझ्या खांद्यावर बसून या इहलोकाची यात्रा संपविण्याचा माझा हा काळ. पण, याच काळात तू मला पोरके करून निघून गेलास. तरी मी नाही म्हणत होती तुला. नको जाऊस , पण तू कधी का कुणाचं ऐकलं? माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा असा काळा दिवस उगवला. बरोबर तीस वर्षापूर्वी तू उदरात असतांना, तुझ्या बाबांनी तेव्हाही माझं ऐकलं नव्हतं. रात्रीच्या वेळी मोटरसायकलचा तो प्रवास अखेरचा प्रवास ठरला. ‘ती रात्र काळरात्र ठरली माझ्यासाठी’. तू उदरात होता केवळ चार महिन्यांचा अंश म्हणून…!
माझ्या लग्नाला फक्त दीडच वर्ष झाले होते. मोटरसायकलच्या अपघातात मला एकटीला सोडून गेलेत तुझे बाबा, कायमचा अंधकार करून माझ्या आयुष्यात. संसाराची घडी बसण्या आधीच विस्कटली. मी खूप सोसले. किती संकटांना तुझ्यासाठी अंगाखांद्यावर खेळवले. तुझ्या आजी आजोबांनी यांना पाच दिवस असतांनाच मला घराबाहेर काढले. कित्येकांनी तर मला गर्भपाताचा पण सल्ला दिला. पण मी हरली नाही रे..! मी नाही ऐकले कुणाचेच. कारण मला माझ्या प्रेमाचा अंकुर वाढवायचा होता.
समाजाच्या विखारी, विषारी नजरा चुकवत लोकांची धुणी भांडी करत मोठं केलं तुला. तुही समजदार होतास माझी स्वप्न पूर्ण केलीत. गेल्याच वर्षी तुझे लग्नही लावून दिले मोठ्या थाटामाटात. तुझा सुखी संसार पाहून मी माझे दुःख गिळून घेतले. पण हे सुख एवढे अल्प काळच माझ्या नशिबी..? असे का ? माझ्या बाळा… मी केले रे हे सर्व सहन तो काळही वेगळा होता जरा.
पण आज …मिनल कसे सहन करेल हे…तेही तुझा अंश तिच्या पोटात असताना सांग ना..ही विस्कटलेली घडी कशी रे बसेल? कसं सांधलं जाईल हे सर्व…दे ना मला उत्तर. विस्कटलेली घडी’…भाव भावनांचा सकारात्मक अन् नकारात्मक असा दोन्ही आविष्कार..कोरोना काळात देशाची विस्कटलेली घडी आजही पुन्हा व्यवस्थित बसत नाही. आईच्या केवळ दोन दिवसाच्या माहेरी जाण्याने विस्कटलेली घडी बसवायला पुन्हा आईच लागते.
घडी मग ती मनाची असो की तनाची, पानाची असो कि धनाची..एकदा विस्कटली की पुन्हा ठीक व्हायला खूप वेळ जातोच. पण पूर्ववत होतेही बरं का…फक्त मनाची घडी जर विस्कटली तर…डोळ्यांवर विश्वास ठेवा…कानांवर नाही. तनाची घडी विस्कटली तर… आहेत ना उपचार, कशाला हवीय नकारात्मकता…मी सकारात्मक ऊर्जेने जाईल ना सामोरे…आजाराला. पानाची घडी विस्कटली तर, मी करेल ना त्याला सरळ..भले पुस्तकात ठेवेल..नाही तरी मला हेही माहीत आहे की, पानाने जर विस्कटायचे नाही असे ठरवले तर..कागदी होडी बनण्याचे भाग्य त्याला कसे बर लाभेल?
धनाची घडी…. विस्कटते कधी कधी प्रत्येकाची.अरे जरा त्या बळीराजाकडे पाहा. कंबर वाकलीय त्याची, नांगराच्या ओझ्याने अन् आपल्या सर्वांसह निसर्गाच्या प्रकोपाने. अवकाळी वादळ, गारांचा पाऊस, मालाला हमीभाव नसणे, हुंडा देवून मुलीचे लग्न. सारं काही विस्कटलेले…
पण देवावर विश्वास ठेवून मातीत दाणे पेरतोच ना..! विस्कटलेली घडी बसवायला विश्वासाची नितांत गरज आहे; तेव्हा आपणही स्वागत करायला शिकूया या घडीचे…!!
खरं तर… ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर म्हणजे कल्पकतेचे दुसरे नाव. विचारांना योग्य दिशा दिली की, ते बरोबर चाल करतात हा त्यांचा सिद्धांत. याच विचारांवर विश्वास ठेवून ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी हा अनोखा विषय देऊन सर्व काव्य रसिकांना जणू सादच घातली.अर्थात सर्वांनीच आपापल्या परीने विषयाला न्याय देतांना, एकापेक्षा एक सुंदर रचना लिहून सरांचा विश्वास सार्थ ठरवला तेव्हा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन व पुढील काव्य प्रवासास अनंत कोटी शुभेच्छा.,!!
*पण थोडं काही…*
मराठी कविता वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय व वैश्विकही आहे. वैयक्तिक अनुभव, सुखदुःखे, मराठी बाणा, देशभक्ती सामाजिकता इत्यादी सर्व क्षेत्रांना व्यापणारी अशी मराठी कविता आहे. “कवींची अभिव्यक्ती तसेच रसिकांना विविध प्रेरणा व आनंद ही दोन्ही उद्दिष्टे लक्षणीयरित्या साधणारी कविता म्हणजे खरी मराठी कविता होय”. केशवसुतांनी कवितांना ऐहिक विषय, लौकिक, भावभावना यात बांधले तर बालकवींनी सौंदर्यवादाच्या प्रेरणा उत्कट पणे एकवटताना अत्यंत निसर्गप्रेम, दिव्यत्वाची अनामिक ओढ, उत्कट व प्रगाड उदासीनता, चैतन्याचा चिंब ध्यास मांडला. आपल्याला या सर्वांची परंपरा जोपासताना बदलत्या काळाचा ठसा आपल्या काव्यावर उमटवायचा आहे. त्यासाठी अधिकाधिक वास्तववादी रचना निर्माण करावयाची आहे. त्याच दिशेने आदरणीय राहुल सरांचा प्रवास निश्चितपणे यशोशिखराकडे जाईल हा माझा विश्वास आहे.
सौ सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक, प्रशासक, संकलक, कवयित्री