‘आजीबाईचा बटवा’ हरवलाय ना..! ; स्वाती मराडे

‘आजीबाईचा बटवा’ हरवलाय ना..! ; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_

बाळ जन्माला आलं की, आईचं दूध म्हणजे त्याच्यासाठी ‘अमृतकण’. या दुधातून त्याला मिळायचं सकसपण.. ते मिळावं म्हणून गर्भारपणापासून व बाळंतपणानंतरही आहार विहाराची पथ्ये पाळून आईला दिला जाणारा सकस आहार. हाडांना बळकटी मिळावी यासाठी औषधी तेलांनी केलं जाणारं मालिश.. दिली जाणारी वाफ.. बाळाला सगळं काही पचन व्हावं म्हणून बाळंतिणीच्या आहारात दिली जाणारी आजीबाईच्या बटव्यातील औषधे.. बाळ चारेक महिन्यांचं झालं की बाळगुटी.. दात येताना चावायला दातपट्टी.. सर्दी पडसे झालेच तर विस्तवावर ओवा टाकून त्याची वाफ बाळाच्या शरीरात जावी म्हणून दिलेला शेक.

थोडा लसूण सोलून आसपास ठेवायचा.. अन् सर्दी पडशानी जणू गायबच व्हायचं.. रांगायला लागलं की सारवलेल्या जमिनीवर रांगणारं बाळ.. चालायला लागलं की मातीतही जाऊन बसतं. या सगळ्यातून कळत नकळत त्याच्या शरीरात एक प्रतिकारशक्ती शक्ती तयार व्हायची. त्यामुळे ठराविक अंतराने दिले जाणारे लस व डोस देण्यासाठीच बाळ डाॅक्टरांकडे जायचं.. अन्यथा इतर गोळ्या औषधांची कधी गरजच भासली नाही.

पण…. पण काळाच्या ओघात गावोगावी दवाखाने आले.. सोबत आधुनिक औषधे अन् इंजेक्शन घेऊन.. बाळ गर्भात असल्यापासूनच औषधांचा मारा सुरु होतो.. बाळंत झाल्यावर काहीही खा असं सांगितलंय डाॅक्टरांनी म्हणून मग काहीही खाल्लं जातं.. ईईई.. घाssण म्हणत मातीशी तर संबंधच नाही मुलांचा.. थोडं आजारपण जाणवले तर आहेच लगेच दवाखाना अन् पुन्हा औषधांचा डोस. कारण, आजकाल आजीबाईचा बटवा हरवलाय नं.. आणि असेल तरी विश्वास कोण ठेवतो. आधुनिकतेच्या नावाखाली जुनं ते सोनं विसरूनच गेलंय जणू..!

तरूणाईने तर आहार, विहार, झोप याबाबत सजग राहण्यापासून फारकतच घेतलीय. वडीलधारी मंडळी समजवायला गेली तर, ती कटकट वाटते. जंकफूड, फास्टफूड, पार्ट्या, फॅशन स्टेटस म्हणून घेतले जाणारे ड्रिंक्स.. वेळ नाही म्हणून घरी वापरले जाणारे इन्स्टंट फूड, पॅकिंग फूड.. खरेतर शेतात असल्यापासून रासायनिक खते, औषधे यांचा मारा सहन करून आलेलं धान्य.. पुन्हा पॅकिंगमध्ये जास्त दिवस टिकावे म्हणून त्यावर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रिया.. यातून त्या आहारात सत्व ते किती उरत असेल.. याशिवाय रेडीमेड मसाल्यांमधून शरीराला घातक अशा अजिनोमोटोचा केला जाणारा वापर.. नुसतं नाव काढलं तरी रसनेला खायची इच्छा होते..!

तरूणाईची फॅशन
व्यसनी आहार
जीवन बर्बादीसाठी
केलेला करार…

ही राजेश धात्रक दादांची रचना बरंच काही सांगून जाते. खरंय हे सगळं खाऊन शरीराचं काय पोषण होणार?.. अन् प्रतिकारशक्ती तरी कुठून येणार.. फळे व भाजीपाल्याची तर खरी चव हल्लीच्या मुलांना माहिती आहे की नाही असाच प्रश्न पडतो. खरंतर अन्न ही जगण्याची गरज न राहता जीभेचे चोचले पुरवण्याची सवय झालीय. हीच सवय व्यसनात कधी परिवर्तित होते व शरीर केव्हा पोखरून काढते हेही समजत नाही.

जेव्हा समजते तेव्हा ब-याचदा वेळ निघून गेलेली असते अन् मग सुरू होतो शरीरामध्ये औषधांचा प्रवास. कधी कधी ही औषधे देखील शरीराला सवय लावतात. घेतली नाहीत तर अस्वस्थ वाटणे, अंग थरथरणे यासारखे प्रकार घडतात‌ नि गरज नसतानाही शरीराला औषधांचा भार सहन करावा लागतो‌. पैसा जाऊन आर्थिक गणित बिघडतं ते वेगळंच. मायकेल जॅक्सन सारख्या व्यक्तीचा मृत्यू औषधांच्या अतिरेकाने झाला. मग सांगा आपण शरीराला कुठे नेतोय?

व्यसनी आहाराचा दुष्परिणाम
अनेक आजारांना आमंत्रण
घातक द्रव्याचे अति सेवन
म्हणजे मृत्यूला निमंत्रण… अगदी वास्तव रेखाटलं इंदूताई.

‘तेव्हा सावध ऐका पुढल्या हाका’ या उक्तीप्रमाणे का वागू नये. शरीररूपी मिळालेली ही अनमोल देणगी आपणच जपायला हवी ना.. आजच्या स्पर्धेसाठी आलेला विषय ‘व्यसनी आहार’ कदाचित यावर विचारमंथन होऊन थोडीफार तरी जाणीव जागृती व्हावी यासाठीच आदरणीय राहुल दादांनी दिला असावा. लेखणीला वास्तवाची जोड देत केलेले आपणा सर्वांचे लेखन केवळ व्यसनापुरतेच मर्यादित न राहता योग, प्राणायाम, सात्विक आहार, चुकीच्या आहाराचे धोके.. अशी विविध विचारपेरणी करणारे ठरले. चला तर मग योग्य आहारासाठी आपल्या कुटूंबापासून सुरूवात करून आणखी एखाद्या कुटुंबालाही याबाबत सजग करूया. साखळी वाढवत नेऊन निरोगी पिढी घडवूया हाही संकल्प करूया. सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐

आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

सौ स्वाती मराडे, इंदापूर जि. पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका/सहप्रशासक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles