
‘चुकलो असेल, पण हरलो नाही’; स्वाती मराडे
_गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_
शतकाकडे वाटचाल ही प्रवासाची सुरू झाली.. वाजत आहे डंका, गाजवत आहे दिशा दाही.. दूर जरी तो विजय आमुचा, पराभवही मान्य नाही.. लढणार आहेत गात्र सदैव, अजुनी ‘आम्ही हरलो नाही’. चुकले असेल काही, चुकांचा शोध घेऊ.. घेऊन मागोवा भूतकाळा, अनुभवातून बोध घेऊ. कुठे चुकले डावपेच, कुठे फितुरीचा पेच.. कशात आम्ही कमी पडलो, सत्तेपासून का दूरच राहिलो.. चिंतन मनन करावे लागेल, जनताहित विचारात घ्यावे लागेल.. आज विरोधी पक्षात राहूनही देशप्रगतीचाच ध्यास धरू, लोकशाहीचं गा-हाणं सत्ताधाऱ्यांना ऐकवू.. विरोधासाठी विरोध न करता देशहितच पाहू.. देशाचा विकास हेच आमुचे तत्व जिवापाड जपू.. लोककल्याणास्तव रात्रंदिन खपू..!
असेच छान छान विचार असणारे लोक राजकारणात असावेत असेच वाटते ना..? कदाचित काही विचारवंत असतीलही असे.. पण दुर्दैवाने आज असे स्वच्छ राजकारण करणारे अभावानेच भेटतील. सत्तेसाठी काहीपण.. असाच सद्य राजकारणाचा फंडा आहे. सत्तेची खुर्ची मुठीत आणण्यासाठी वापरले जाणारे डावपेच सामान्य जनतेच्या विचारांच्या पलीकडचे असतात. कधी कुणाशी युती होऊन कोण निवडून येईल व कुणाची सत्ता येईल याचा अंदाज बांधणे कठीणच. एक सरकार पाडून येनकेन प्रकारे दुसरे सरकार बनवता येते याची उदाहरणेही पहायला मिळत आहेत त्यामुळेच कदाचित विरोधी पक्षालाही वाटत असावे आम्ही हरलो नाहीच. विनायक पाटील दादांची ही रचना त्यासाठीच…!
‘काळ जरी बदलला
आम्ही हरलो नाहीच,
खाल्ल्या कितीही कोलांट्या
तरी कळेना काहीच’
खरेतर कोणत्याही देशाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी विरोधी पक्षही तेवढ्याच ताकदीचा असावा लागतो. तत्वनिष्ठा, देशसेवेशी बांधिलकी जपत सत्ताधाऱ्यांच्या योग्य निर्णयाला पाठिंबा देत तर अयोग्य निर्णयाला कडाडून विरोध करत जेव्हा तो देशहित साधतो; तेव्हा त्यांना नक्कीच वाटत असेल ‘आम्ही हरलो नाही’च. असाच विचार करणा-या विरोधी पक्षाचीही गरज असतेच. अगदी हाच विचार ‘विद्या निनावे’ ताईंच्या रचनेतून झळकला .
‘आम्ही हरलो नाहीच
खेळता राजकारणाची खेळी,
निकोपपणे शह दिला
सोडली नाही कधीच पातळी..’
आज स्पर्धेसाठी आलेले चित्र भारतीय संसदेच्या विरोधी पक्षाचे.. पक्षांतर्गत बरीच पडझड होऊनही आम्ही हरलो नाहीच.. हे सांगणारे. हा आशावाद म्हणावा की केवळ पोकळ वल्गना, की हाती देशहिताची मशाल पेटती ठेवून नवा लढा उभारणार याचा संकेत देणारी.. चित्रातून आपण अनेकविध अर्थ काढू शकतो. आपणा सर्वांच्या रचनांमधून हा मतितार्थ झळकलाच. शिवाय सांकेतिक अर्थानेही काही रचना आल्या. आपली कवीमनाची भरारी सर्वांगाने समृद्ध होत आहे याचा मनोमन आनंद झाला. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार. 🙏
स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/कवयित्री/लेखिका