
श्रम हाच देव..
निर्भयपणे पावले टाक
पत्थरासही फोडून टाक..
ज्ञानगंगेचे गूढ किनारे
मन लावून गाठून टाक..
मग नसे तुला कुणाचे भेव
कारण श्रम हाच देव..
पर्वतांशी टक्कर दे
सागरातही रस्ता शोध..
जे हवे ते गवसल्याचा
होईल तुला आत्मबोध..
मनगटावर विश्वास ठेव
कारण श्रम हाच देव..
बीज बनून रूजून बघ
वृक्ष होऊन वाढून बघ..
दगडाचीही कर बाज
गवतावरही झोपून बघ..
मग उभे राहिल मागे दैव
कारण श्रम हाच देव..
संत नको माणूस बन
ससा नको सिंह बन..
दातृत्वाचा गुण बाळगून
कर्णासारखा उदार बन..
वनवास रामाचा आठव
कारण श्रम हाच देव..
काट्यांकडे बघू नकोस
भार कुणावर बनू नकोस..
जय पराजय या तर लाटा
चारित्र्यास तू विकू नकोस..
ओठात पोटात एकच ठेव
कारण श्रम हाच देव..
कारण श्रम हाच देव..
सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दा.न.ह.