
अभूतपूर्व आठवणीतील नयनरम्य ‘निशांत’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा
“मी पाहुणा म्हणून नव्हे;तर शालिनी आईंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय’; राहुल पाटील
सविता पाटील ठाकरे, कार्यकारी संपादक
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या १८६ व्या ‘निशांत’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ निशांतच्या कवयित्री/लेखिका शालिनीताई देवरे वय वर्ष ७८ यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व, आठवणीतील असाच नयनरम्य प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न झाला. फक्त ८ वी पर्यंत शिक्षण झालेले असूनही, बालपणी तसेच विवाहानंतर कुठेतरी लिहून ठेवलेल्या कवितांचा संग्रह काढणे जोखीमीचे काम मी प्रकाशक म्हणून अत्यंत आनंदाने स्वीकारले व अल्पावधीतच सुंदर असे काव्यसंग्रह निर्मितीचे भाग्य मला लाभले. ‘मी जरी इथे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून दिसत असेल; परंतु मी पाहुणा म्हणून नव्हे तर ज्येष्ठ कवयित्री “शालिनी देवरे’ यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे’, प्रतिपादन मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, संपादक व प्रकाशक राहुल पाटील, नागपूर यांनी केले. ते प्रकाशन समारंभात अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठाचा आशीर्वाद हा आत्मविश्वासरूपी उर्जा प्रदान करतो. तेव्हा आपल्याही कुटुंबात कुणाचे लेखन, साहित्य कविता, स्फुट, ललित कुठेतरी लिहून असल्यास माझ्याकडे पाठवू शकता त्यांच्या साहित्य निर्मितीस मी पुरेपूर प्रयत्न करेन. अशी ग्वाही राहुल पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित काव्यरसिकांना दिली.
ज्येष्ठ कवी फ.मू.शिंदे म्हणतात त्याप्रमाणे…
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा
अशाच एक आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा समारंभ नुकताच पार पडला. धुळे जिल्ह्यातील म्हसदी, तालुका साक्री हे गाव. उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई धनदाई’ देवी यासाठी हे प्रसिद्ध आहे. अनेक नर रत्नांची खाण या गावातून आजवर निर्माण झालेली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात अनेक दिग्गजांनी आपला झेंडा संपूर्ण महाराष्ट्रात फडकवलेला आहे. अशाच एका नररत्नापैकी एक नाव म्हणजे, आप्पासाहेब शांताराम नानाभाऊ देवरे. साधारणतः 80 च्या दशकात ज्यावेळेस शेतकरी संघटनेचे गारुड शरद जोशींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्रात पसरलेलं होतं, त्यावेळेस आप्पासाहेब छातीवर लाल बिल्ला लावून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरील लढाईत उतरले होते. त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला.
हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे, नुकताच पार पडलेला ‘निशांत’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा. मराठीचे शिलेदार समूह प्रकाशित “निशांत”काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. विधान परिषद सदस्य जयंतराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर चे सर्वेसर्वा राहुल पाटील सर हे मुख्य अतिथी होते. वयाच्या ७८ व्या वर्षी श्रीमती शालिनी शांताराम देवरे यांचा “निशांत”हा काव्यसंग्रह प्रकाशित करून आदरणीय राहुल सरांनी सर्वांसाठी एक नवा आदर्श घालून दिला.
आपण ज्ञातच आहोत की अगदी नवोदित तसेच जुन्या साहित्यिकांना आजच्या बाजारू दुनियेत कुणीही स्थान देत नाही. अशा वेळेस श्रीमती शालिनीताई यांचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची जबाबदारी मराठीचे शिलेदार समूहाने स्वीकारली व एका दिमाखदार सोहळ्यात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री जयंतराव जाधव यांनीही श्री.राहुल सर आणि सर्व मराठी सारस्वत मंडळीचे कौतुक करत या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक करून या वयात सुद्धा शालिनीताईंचा हा उत्साह आणि लेखन कौशल्याचे भरभरून कौतुक केले.
या प्रसंगी ‘निशांत’ या काव्य संग्रहासोबत कै.शांताराम देवरे लिखित ‘पर्यावरण प्रदूषण संतुलन’ आणि ‘स्वातंत्र्योत्तर ग्रामीण भारत’ याही पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कै.शांताराम देवरे यांचे शेतकरी संघटनेच्या कार्यातील योगदान व एक शिक्षक ते आदर्श शेतकरी या जीवन प्रवासाचा अनेकांच्या वतीने आढावा घेण्यात आला. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून रमेशजी मिसाळ, नरेशजी म्हस्के, कैलास चुंभळे, ज्येष्ठ कवी नरेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मराठीचे शिलेदार समूहाच्या वतीने राहुल सरांच्या शुभहस्ते ज्येष्ठ कवियित्री व निशांतकार शालिनीताई देवरे यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी साहित्य निर्मितीत समाजाचे योगदान विशद केले व सोबतच नव साहित्यिकांना आपल्या साहित्याच्या प्रकाशनासाठी समूहाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले. मराठीचे शिलेदार समूहाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक साहित्यगंधाचेही अनेक मान्यवरांनी या वेळेस कौतुक केले.
आपल्या मनोगतातून सिलवासा येथील शिक्षक ‘प्रशांत ठाकरे’ सरांनी कै.शांताराम अप्पांच्या कार्याला उजाळा देताना “निशांत’चे कौतुक केले. जिजाऊ ब्रिगेड दादरा नगर हवेलीच्या प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती. ठाकरे आणि देवरे परिवाराचे असलेले स्नेहबंध कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गार राहुल पाटील सरांनी काढलेत.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन हिंमत देवरे व कवयित्री जयश्री वाघ यांनी अतिशय सुंदर रित्या केले. कार्यक्रमाचे आयोजन विनय शांताराम देवरे, सौ दिपाली विनय देवरे, श्रीमती.भारती दिलीप धोंडगे, श्री गोकुळ सिताराम गांगुर्डे, सौ तिलोत्तमा गोकुळ गांगुर्डे, श्री सुभाष दयाराम भदाणे, सौ रंजना सुभाष भदाणे, श्री संदीप मनोहर पाटील, सौ. प्रांजली संदीप पाटील यांनी केले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येनं देवरे परिवाराचे आप्तस्वकीय आणि मराठीवर प्रेम करणारे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पाटील, सुभाष मिसाळ साहेब, बाळासाहेब मोरे, महेंद्र आहेर, संदीप जाधव,आण्णासाहेब कानडे बोनदार्डे साहेब,आदित्य देवरे, सदाशिव फाऊंडेशन मित्र मंडळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सविता पाटील ठाकरे
कार्यकारी संपादक
साप्ताहिक ‘साहित्यगंध’