
धन्य माता सावित्री
धन्य माता सावित्री तूज प्रणाम कोटी कोटी |
सन्मानाने जगतो आम्ही सावित्रीच्या लेकी ||
ब्राम्हण धर्ममार्तंडाच्या स्त्रियांना नव्हता वाव
‘स्त्री शिक्षण घेणे म्हणजे भ्रष्ट कुळाचे नाव ‘
पण माता सावित्री तूच केले खुले शिक्षणाचे द्वार
तूच केला स्त्रियांचा उद्धार
धन्य माता सावित्री…………..
‘बालविधवा’ व ‘सतिप्रथा’ ह्या अनिष्ठ कुप्रथा
कोणीच नव्हते तयार त्यांची ऐकूण घ्यायला व्यथा
पण माता सावित्री तूच दिला या प्रथेला तडा
तूच दिला खंबीरतेने लढा
धन्य माता सावित्री………………..
‘केशवपन’ ही कूप्रथा स्त्रियांच्या मानभंग करणारी
धर्ममार्तंडाची लादलेली होती ती एक गुलामगिरी
पण माता सावित्री तूच केला सनातन्याविरुध्द व्हाव्यांचा बंड
तूच प्रज्ञा जागवून केले क्रांतीकारी बंड
धन्य माता सावित्री…………………
अज्ञानाच्या गर्तेतून आणले आम्हा प्रज्ञारुपी प्रकाशात
करून दिली माणुसकीची जाण,जागविला आम्हात स्वाभिमान, मिळाला आम्हा सन्मान,
तूच घडविली सामाजिक क्रांती
तूच केली स्त्रियांची दास्यातून मुक्ती
धन्य माता सावित्री तूज प्रणाम कोटी कोटी |
सन्मानाने जगतो आम्ही सावित्रीच्या लेकी ||
प्रा. डॉ.कल्पना सांगोडे(नंदेश्वर)
अर्जुनी /मोर, जि.गोंदिया
=======