
परिस्थितीचे जाते…
सुपातल्याने स्वतःलाही, कधी सुरक्षित समजू नये
जात्यातल्याच्या भरडण्यावर,उगाच छद्मी हसू नये..
परिस्थितीच्या जात्याचा, वेगवेगळा नियम नसतो
आज आंम्ही उद्या तुम्ही, इतकाच तो फरक असतो.
पहिली ते शेवटची मूठ, कुणास सूट घडीची मिळते
झाडून पुसुन सुप अखेरीस, जाते सार्यांना गिळते..
नियतीच खरी सूत्रधार, आपल्या हाती काही नसते
ज्याचा त्याचा अहंकार, ज्या त्या वेळी ठेचत असते.
भौतिक ऐश्वर्य आले तरी, तू कदापि ही माजू नको
अन् परिस्थितीने आलेल्या, गरिबीलाही लाजू नको.
इथलेच सारे स्थावर जंगम, जे इथेच सारे घेणे देणे
सांग तुझे इथे काय आहे ? रिक्त हातीच जाणे येणे.
माझे माझे व्यर्थच ओझे, कण कण ही वाटून घ्यावे
चांगल्या वाईट कर्माचे भोग, इथेच सारे भोगून जावे
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
=======