
काय सांगता.,? ‘महिनाभर भारतात मान्सून सक्रीय नसेल’
‘स्कायमेट हवामान संस्थेचा अंदाज
नवी दिल्ली: पुढील चार आठवड्यांत भारतात मान्सुन फारसा सक्रिय होणार नाही, त्यामुळे शेती आणि पाण्याच्या उपलब्धतेवर ताण येण्याची शक्यता आहे असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे.
या संस्थेने म्हटले आहे की, विस्तारित रेंज प्रेडिक्शन सिस्टम नुसार पुढील चार आठवड्यांसाठी, 6 जुलैपर्यंत मान्सुनची स्थिती निराशाजनक राहील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतीच्या पेरणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतातील मध्य आणि पश्चिम भाग, जे मुख्य मान्सून झोन आहेत, त्यांना हंगामाच्या सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे कोरडेपणाच्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नैऋत्य मान्सून 1 जूनच्या नेहमीच्या तारखेऐवजी एक आठवड्याच्या विलंबानंतर 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला.
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने केरळमध्ये मान्सूनला विलंब केला आणि आता हे चक्रीवादळ पर्जन्यमान प्रणालीच्या प्रगतीमध्ये अडथळा आणत आहे,असे स्कायमेटने म्हटले आहे. मान्सूनचा पाऊस साधारणपणे 15 जूनपर्यंत महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारचा अर्धा भाग व्यापतो.
सध्या, मान्सूनच्या लाटेचे दृश्यमान प्रकटीकरण ईशान्य आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंत मर्यादित आहे. दुर्दैवाने, नजीकच्या भविष्यात मान्सुन पुढे सरकण्यासाठी पुरेशी अनुकुल स्थिती नाही असेही या संस्थेने म्हटले आहे.