
‘भविष्यवेधी शिक्षण’ प्रशिक्षणाचा दुसरा दिवस
_जि. प. शिक्षण विभाग वर्धा यांचा उपक्रम_
समुद्रपूर: शिक्षण विभाग, जिल्हा परिषद वर्धा व जिल्हा प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भविष्यवेधी शिक्षण’ प्रशिक्षण कालपासून सलग चार दिवस संस्कार ज्ञानपीठ या केंद्रावर सुरु राहणार आहे. या प्रशिक्षणाचा आज दि १७ जून २०२३ रोजी दुसरा दिवस गेला. विशेषत: प्रशिक्षणाच्या दुस-या दिवशी पंचायत समितीस सुटी असूनही तालुक्यातील सर्व शिक्षक या प्रशिक्षणास संपूर्ण कालावधीत पूर्ण वेळ उपस्थित होते. आज प्रशिक्षणात अभ्यास प्रकरण भाग ७ पर्यंत पूर्ण झाले असून, उद्या रविवार सुटीच्या दिवशीही ९.०० ते ५.०० पर्यंत प्रशिक्षण संस्कार ज्ञानपीठ या केंद्रावर असेल, उद्या प्रशिक्षणाचा तिसरा दिवस असल्याने प्रशिक्षणाचा अंशत: भाग हा प्रशिक्षणात पूर्ण करून घेण्यात येणार आहे.
वर्धा जि प एम्पलॉईज अर्बन बँकेच्या संचालकांची निवडणूक येत्या २५ जून रोजी होणार असून, त्या निमित्ताने निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले सर्वच पैनल व त्यांचे उमेदवार प्रचार दौ-याच्या निमित्ताने सर्वच तालुक्यातील प्रशिक्षण केंद्रास भेटी देत असल्याने एक नवा उत्साह शिक्षकांमध्ये या दरम्यान दिसून आला. तसेच प्रशिक्षणाचा फायदाही या सर्वच पैनलला प्रचार, प्रसार व शिक्षकांच्या भेटीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे शिक्षकांमध्ये चर्चा आहे. त्या अनुषंगाने सुटीच्या कालावधीत न झालेल्या भेटींचा योग असल्याचे समाधानही शिक्षकांमध्ये आहे. एकंदरीत प्रशिक्षणाचा तिहेरी फायदा हा सर्वांच्या हिताचाच असल्याचे उघडपणे शिक्षकात बोलल्याचे सध्या सर्वच तालुक्यातील प्रशिक्षण केंद्रावर सारखेच चित्र आहे.
*बँकेच्या निवडणूक प्रचाराला ऊत*
भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षणाचा कालावधी लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात होऊ घातलेल्या बँकेच्या निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांना प्रचाराचा ऊत आल्याचे दिसून आले. आपापल्या पैनल प्रमुखाच्या मदतीने प्रत्येकजण आपली सत्यता शिक्षकापुढे मांडण्याचा प्रयत्नही करत आहेत. इतर तालुक्यातील शिक्षक उमेदवाराचे न बघितलेले चेहरे या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी होत असल्याने पाहवयास भेटत असल्याचे समर्थक व विरोधक खाजगीत बोलत असल्याचे चित्र सध्या सर्वच प्रशिक्षण केंद्रावर आहे.