
…नाही झाली बोहणी, कशी देऊ तुला वर्गणी?
निवडणुकीत आश्वासनांची खैरात, पण विकासाच्या नावाने बोंब
भंडारा – विशिष्ट विचारधारा, पक्षाविषयी असलेली अढळनिष्ठा, नेतेमंडळी विषयी आदरभाव या प्रकारचे राजकारण हळूहळू लोक पावत आहे. आता मात्र सत्तेसाठी राजकारण करणारा वर्ग निर्माण होत आहे. सत्तासुंदरीच्या भोवती रंगाळलेले नेते आणि त्या त्या परिस्थितीनुसार करण्यात येत असलेले राजकारण असे चित्र जिल्ह्यात सर्रास पहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी मतदारांना दिलेले आश्वासन फोल ठरत असून राजकारणाच्या माध्यमातून सत्तेच्या समीप जाऊन ठेकेदारी कल्चरचा पायंडा घालण्याचा अनाठायी प्रयत्न बहुतांश लोकप्रतिनिधी कडून होत आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात ‘राजा’ म्हणून गाजावाजा करीत मतदारांना आश्वासन देणाऱ्या या लोकप्रतिनिधी ‘सेवकां’कडून राजालाच उलटी उत्तर मिळत आहेत. विकास कामांची कंत्राट न मिळाल्यामुळे ” …नाही झाली गा बोहनी, तर मग तुला कशी देऊ वर्गणी..?” अशी बोंब आता खुद्द 52 जिल्हा परिषद क्षेत्रातील बहुतांश जिल्हा परिषद सदस्य ठोकत असल्याचे मजेशीर पण तितकेच गंभीर चित्र जिल्ह्यात दिसत आहेत.
निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात करायची आणि निवडून आल्यानंतर पाच वर्षे मतदारांच्या तोंडाला पाने पुसायची हा पायंडाच पडला आहे. भंडारा जिल्हापरिषद अंतर्गत येत असलेल्या 52 जिल्हापरिषद क्षेत्रातील गट व गण परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांची लोकप्रतिनिधीकडून विकासाची भाबडी अपेक्षा व प्रशासकीय खेचाखेची यामध्ये फरफट होत असून लोकप्रतिनिधींकडून केलेली विकासाची अपेक्षा दिवास्वप्न ठरत आहे.
एकंदरीत 52 जिल्हापरिषद गटातून आजपर्यंत निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींनी वाहत्या गंगेत हात धूवून स्वतःचा विकास करुन घेतला. मात्र, ज्या गटातून निवडून आलो, त्या परिसराच्या विकासासाठी कोणताही प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून आले नाही. जिल्हापरिषद गटातील मतदारांना निवडणुकीच्या वेळेवर दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने परिसरातील समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत. निवडणुकीत उभ्या असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी वेगवेगळी आश्वासनांची खैरात वाटलीत. पण निवडून आल्यावर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडलाय. जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील गावागावात असलेल्या रस्त्यांची पार दुर्दशा झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तर अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे तयार झाले आहे. निवडणुकीत उभे राहून उमेदवारांनी निवडून आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची वाफ न करता परिसराचा विकास कामांकरीता लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा जिल्ह्यातील ग्रामिण परिसरातील जनतेने केली आहे.