
वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
पवनी: पवनी तालुक्यातील गुडेगाव(सावरला) येथे वाघाने तरुणावर शेतशिवारात शेळ्या चारत असताना हल्ला करून ठार केला. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
गुडेगाव येथील सुधाकर सिताराम कांबळे वय ४३ वर्ष हा शेतकरी असुन शेतीचा काम करायला गेला असता आज अचानक रिमझिम पावसाला सुरुवात झाली त्यामुळे घरच्या बकऱ्या शेतावर चारण्यासाठी घेऊन गेला. शेतशिवार जंगलाला लागून असल्यामुळे झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने काही कळण्याच्या आत सुधाकर कांबळे यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
सुधाकर कांबळे याला दोन मुली व एक मुलगा असा परिवार असून कुटुंबातील कमवता माणूस वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवाने मृत्यू पावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाघाचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करून जनतेच्यामनातील भीती नाहीशी करावी, व मृत व्यक्तीला मोबदला मिळावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.