
आंतरराष्ट्रीय लिंडाऊ संमेलनात; पुण्याच्या शुभंकर अंबिकेची निवड
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: जगभरातील सुमारे 40 नोबेल विजेते आणि 600 निवडक तरुण शास्त्रज्ञ सहभागी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘लिंडाऊ’ संमेलनात यंदा पुण्याचा संशोधक शुभंकर अंबिके यांची निवड झाली असून जर्मनीतील ‘म्युनिक’ येथे टेक्निकल युनिव्हर्सिटीत इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पीएचडी करणा-या शुभंकरला काऊंसिल फॉर द लिंडाऊ नोबेल लॉरिएट मिटिंग्सने नामांकित केले आहे.
दरवर्षी हे अधिवेशन फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी, मेडिसिन, आणि इकॉनॉमिक्स या नोबेल पुरस्कार क्षेत्रांतील एका विषयावर केंद्रीत असते. अग्रगण्य शास्त्रज्ञांना शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारे हे 72 वे अधिवेशन यंदा दि. 25 ते 30 जून या कालावधीत जर्मनीतील लिंडाऊ या शहरात होत आहे. शुभंकर अंबिके याचे संशोधन मुख्यत्वे यकृत रोगप्रतिकारक शास्त्रावर केंद्रित असून कोविड-१९ च्या उपचारात्मक धोरणावरील संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
व्हायराॕलॉजी आणि इम्युनोलॉजी क्षेत्रात पुढील संशोधनासाठी भारतात परतण्याचा त्याचा मानस आहे. शुभंकर अंबिके पुण्यातील भावे हायस्कूल, मॉडर्न कॉलेज आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थांचा माजी विद्यार्थी आहे.