
भूगंध
आल्या मृगाच्या सरी
अवघी धरा न्हाली
दरवळला भूगंध
हास्य फुलले गाली
मृगाची पहिली सर
मृत्तीकेशी करी मिलन
सुगंधित आसमंत
बहरले नवजीवन
पशुपक्षी आनंदीत
भिजले मृगसरीत
स्वप्न बळीच्या नयनी
भाव दाटले हर्षित
रानीवनी केकारव
मयुराने दिली साद
नाचू लागला कौतुके
घुमला चराचरी नाद
भूगंध सुगंधीत सर्वत्र
मन झाले प्रफुल्लित
चैतन्यानी बहरली सृष्टी
रोम रोम झाले पुलकित
सुलोचना लडवे,अमरावती