
भूगंध
समुद्रातच आहेस का अजून
फारसा गाजावाजा होईना
भेटीचा आवेग दिसेना….
वाऱ्याचं वागणं ही कळेना
काहीलीच तुझी कसली रे धग
तू येशील म्हणून पंखे विसावले
ताक थंड पेयांना सुट्टी आली
चहा कॉफीचे मगही सरसावले
किती दिवस झाले तुझे गाणे ऐकून
साथसंगत नितळ एकतारी सुर
तुझी थंड हवा लागली ना…
जशी नीज येते आईच्या मांडीवर
पाऊस झाला का तुमच्याकडे
हेच सध्या ऐकायला येतं बघ
नाराजीचा सुर चिंता उद्याची
शेतकरी दादा हवालदिल बघ
तुझ्यासवे बागडायची सवय
कर ना रे नभी ढगांची गर्दी…
कालच्या दुःखाचाही विसर पडावा
येऊ दे ना रे सुखाची वर्दी….
पावशा ओरडतो जीव तोडून
त्याच्यावर तर दया कर….
चार महिने लाही झाले रे
वय झालेल्या देहांची हौस पुरी कर
विचारांनाही मरगळ आली बघ
तुझ्या येण्याने भूगंध पसरेल…
निसर्गाची किमया पाहून…
माणूस सुद्धा कर्माला लाजेल…
सिंधू बनसोडे, इंदापूर पुणे