
पटोले नंतर आता ‘या’ नेत्याचे भावी पालकमंत्री म्हणून झळकले पोस्टर
भंडारा – वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून राजकीय पक्षांकडून बॅनरबाजीचा ट्रेंड सुरू झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आता भंडारा पवनी विधानसभेचे शिंदे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा सोमवारी (ता. 26) जिल्ह्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याट अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात झळकत आहेत. त्या बॅनरवर भोंडेकरकांना भावी पालकमंत्री म्हणून संबोधित करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून राज्यातील विविध भागात राष्ट्रवादी, काँग्रेस असो या पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा या उद्देशाने बॅनर लावले होते. नुकतेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांना भावी मुख्यमंत्री संबोधित करून शुभेच्छा दिल्या. त्यातच आता शिवसेनेने पुढची उडी घेतली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिवसेनेच्या शिंदे गटाने आ. भोंडेकर यांच्या वाढदिवशी भाजपा खासदारांच्या शहरात थेट जिल्हायाचे ‘भावी पालकमंत्री’ अशी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमुळे शहारासह जिल्ह्यात शिवसेना पुन्हा चर्चेत आली आहे.
सक्रिय आमदार निष्क्रिय खासदार ?
भंडारा शहरात भुयारी गटारी प्रकल्प, नवीन नळ पाईपलाईन योजना, महिला सामान्य रूग्णालय, सांस्कृतीक भवन, वैनगंगा पर्यटन स्थळ, खांबातलावाचे सौदर्यकरण तसेच ५१ फुट भगवान श्रीरामचंद्र यांच्या मुर्तीचे भुमीपूजन अशी एक नाही बरीच कामे होताना दिसत येत आहेत. याकडे मुख्यमंत्र्याचे विशेष लक्ष भंडारा जिल्ह्याकडे असल्याचे समजून येते. भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत.
एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून भंडारा विधानसभेचे आ. नरेंद्र भोंडकर हे त्यांच्या अतिशय जवळचे समजले जातात. त्यामुळे आमदार साहेब सध्या ‘आपला हाथ जगन्नाथ’ या म्हणी प्रमाणे जिल्ह्यात मोठ- मोठी कामे खेचून आणत आहेत. परंतु भंडारा लोकसभा खासदार म्हणून सुनील मेंढे यांच्याकडून जनतेला ज्या अपेक्षा होत्या पुर्ण होतांना दिसून आल्या नाहीत. वास्तविक पाहता केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून, राज्यात भारतीय जनता पार्टी व शिंदे गट यांचे शासन आहे. एवढे असून सुध्दा भाजपाचे खा. मेंढे यांना कुठेही झुकते माप मिळाल्याचे जाणवत नाही.
वास्तविक पाहता पाच वर्षात भंडारा-गोंदिया क्षेत्राचा झपाट्याने विकास व्हायला हवा होता. परंतु खासदार साहेब आपल्या जिल्ह्याचे लाँबिग करण्यात यशस्वी झालेले दिसत नाही. सध्या विचार केला तर, खासदार निधीतून विकास कामे झाली नसल्याचे चित्र दिसते. तुलानात्मक दृष्टया विचार केला असता आ. नरेंद्र भोंडेकर यांनी विकास कामाचा लावलेला पाढा जोरात सुरू असून आमदार म्हणून त्यांनी केलेली कार्य जनतेसाठी फायद्याची ठरत आहे.
” भाजपाने भंडारा विधानसभा क्षेत्रात 1990, 1995, 1999 व 2014 या काळात प्रतिनिधित्व केले. तर 2009 व 2019 या काळात शिवसेनेने भंडारा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. आ. नरेंद्र भोंडेकर हे या पक्षाचे नेते आहेत, म्हणून या पक्षात ‘भावी पालकमंत्री’ म्हणून यांच्याकडे पाहणे हा कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन योग्यच आहे. त्यांनी आपली इच्छा प्रकट करणे यामध्ये चुकते कुठे? सध्या आ. नरेंद्र भोंडेकर हे पालकमंत्री पदाचे निश्चितच दावेदार आहेत.”
– अनिल गायधने , जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)