
शंभर मि.मी. पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये
_जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे_
_‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत कृषी संजीवनी कार्यक्रम_
नागपूर: शंभर मि.मी. पाऊस झाल्याशिवाय, पुरेसा वाफसा आल्याशिवाय, बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता तपासणी केल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले आहे.
शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत 25 जूनपासून संपूर्ण जिल्ह्यात सुरू झालेल्या कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषि तंत्रज्ञान प्रसार दिनाचे औचित्य साधून नागपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पांजरी लोधी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच नानीबाई भटेरो होत्या. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई नगरारे, माजी सरपंच भरत ठाकूर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर मोतीकर, मंडळ कृषी अधिकारी युवराज चौधरी, कृषी सहायक अनुराधा गायकवाड, नितीन मोहिते, प्रगतिशील शेतकरी पुंडलिक भटरो, गजानन ठाकूर उपस्थित होते.
कृषी क्षेत्रात बीजोत्पादन, जैविक कीडनाशक निर्मिती, सेंद्रीय खत उत्पादन, सूक्ष्म सिंचनाचा वापर, कृषी यांत्रिकीकरण काढणीत्तर व्यवस्थापन आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात विकसित झालेल्या कृषी तंत्रज्ञानाबाबत सखोल मार्गदर्शन तसेच विविध योजनांची माहिती श्री. मनोहरे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमादरम्यान कृषी सहायक अनुराधा गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी उमाकांत ठाकूर आणि विजय ठाकरे या शेतक-यांना राज्य सोयाबीन उत्पादकता वाढ योजनेंतर्गत प्रमाणित बियाण्यांचे वाटप करण्यात आले.