
ॲड कोमल ढोबळे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची घेतली भेट
_सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ_
सोलापूर: राज्यात हातपाय पसरू पाहणाऱ्या बीआरएसचे प्रमुख्य तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. महाराष्ट्रात आपले राजकीय प्रस्थ वाढवण्याच्या दृष्टीने तेलंगणाच्या बीआरएस पक्षाने आपला मोर्चा पूर्ण ताकदीने वळवला आहे. त्यातील पहिली शिकार राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेची केली.
सध्या ते पंढरपूर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित मानले जातात. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी भेट घेऊन सत्कार केला आहे. या भेटीमुळे आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल ढोबळे यांनी भेट घेतली. ही भेट सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. ही भेट काँग्रेस वर्तुळात धक्का देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवास वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर कारणीभूत ठरले होते. तोच पॅटर्न यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होतो की काय, अशी चर्चा आता सुरू झाली.
अॅड. कोमल ढोबळे या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या असून ढोबळे पालकमंत्री असताना जिल्ह्यात त्यांच्या संपर्क होता. माजी मंत्री ढोबळे कुटुंब मूळचे अक्कलकोट तालुक्यातील असल्यामुळे अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी हि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय शाहू शिक्षण संस्था व बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून राज्यभर मोठे प्रस्थ निर्माण केले. त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी कदाचित बीएसआरच्या त्या उमेदवार होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
याबाबत कोमल ढोबळे-साळुंखे म्हणाल्या, तेलंगणा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे स्मारक उभा करून आदर्श निर्माण केला आहे. हे आपल्या राज्य सरकारला जमले नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यासाठी भेट घेतली. अजून कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. राजकीय घोडा मैदान अजून लांब आहे. ज्यावेळी पक्षप्रवेश होईल त्यावेळी सर्वांना नक्कीच सांगितले जाईल. जो पक्ष माझ्या संघटनेचे सुरू असलेले काम थांबवू नको म्हणेल, त्या पक्षाबरोबर जाणार असल्याचे कोमल ढोबळे-साळुंखे यांनी प्रसार माध्यमास सांगितले.