
‘संतांच्या स्वप्नातील ‘स्वच्छ भारत’ नव्या पिढीसाठी आव्हानच..!; स्वाती मराडे
_गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_
आजोबा त्यांच्या बालपणातील गमतीजमती छोट्या अमेयला सांगत होते. अमेय त्यांना एकेक प्रश्न विचारू लागला.
“आजोबा तुम्ही विहिरीत, नदीत पोहायला जायचा?”.
“हो रे बेटा, खूप धमाल करायचो आम्ही..”
“नदीवरच कधी कधी अंघोळ पण करायचात.. स्वच्छ अंघोळ व्हायची?”
“अगदी स्वच्छ व्हायची.. अरे तेव्हा आताच्या सारखा नदीमध्ये कचरा नसायचा. पाण्याचा तळ दिसेल इतकी नदी स्वच्छ असायची. आम्ही तर ते पाणी प्यायचोसुद्धा”
हे ऐकून अमित फुरंगटुन बसला. “अरेरेरे.. काय झालं आमच्या बच्चाला?” आजोबा.
“आमच्यासाठी का नाहीत अशा स्वच्छ नद्या..आम्ही नेहमी त्या स्विमिंग टॅंक नामक डबक्यातच पोहायचं.. नेहमी जाईल तिथे पॅकबंद पाणीच प्यायचं.. त्या काळात तर म्हणे प्लॅस्टिक सुद्धा अगदी कमी होतं. त्यामुळे गाव रस्ते स्वच्छ रहायचे. आता रस्त्याच्या कडा, मैदाने, सार्वजनिक जागा याच कच-यांनी भरल्यात.. तुमचा तो स्वच्छतेचा समृद्ध वारसा आम्हाला का नाही मिळाला..?”
हे ऐकून आजोबा मात्र विचारात पडले.
खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न. आपले घर, परिसर, गाव व पर्यायाने देश स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. माझा कचरा माझी जबाबदारी असे वागलेच पाहिजे. पॅकबंद खाऊ खाऊन झाला की, प्लॅस्टिकच्या बाॅटल वापरून झाल्या की कुठेही फेकतात. दुर्दैवाने काहींना तर आपण हे फेकून कचरा करतोय याचीही जाणीव नसते. कित्येक जण घरातील कचरा कॅरीबॅगमध्ये भरून आडबाजूला नेऊन टाकतात. ओला कचरा, सुका कचरा याविषयी तर पालिकाच उदासीन दिसतात. सगळं एकाच ठिकाणी ओतून नेतात. प्लॅस्टिक कचरा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा, हाॅस्पिटलमधील कचरा.. हा कचरादेखील हैराण करणाराच. ओल्या कचऱ्याचे विघटन होऊन लवकरच खत तयार होते पण प्लॅस्टिक वापरावर आपणच मर्यादा आणली पाहिजे. कारण या कच-याचे विघटन हजारो वर्षे होत नाही. नद्या, माती हे मिरवताना अक्षरश: गुदमरत आहेत.. मग हाच अस्वच्छ पर्यावरणाचा वारसा आपण पुढील पिढ्यांना देणार का? संतांच्या स्वप्नातील ‘स्वच्छ भारत’ नव्या पिढीसाठी आव्हानच ठरणार आहे.
स्वच्छता म्हटलं की सदैव एक मूर्ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे गाडगेबाबांची. फाटके असले तरी स्वच्छच कपड्यात असायचे. ज्या ज्या गावात ते जायचे तिथे आधी खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचे. रात्री त्याच गावात किर्तन करायचे. लोक जे काही देणगी स्वरुपात देतील त्याचा उपयोग त्याच गावात पायाभूत सुविधा दवाखाना, शाळा, धर्मशाळा इत्यादींच्या उभारणीसाठी करायचे. अगदी हाच धागा पकडून सन २०००-०१ मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ सुरू केले. यासाठी ग्रामपंचायतीना लाखोंची बक्षिसे ठेवली. बक्षिसाची रक्कम गावाच्या विकासासाठी वापरली जाऊ लागली. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले.
असा हा गहन प्रश्न आपणा सर्वांपुढे ठेवण्यासाठी आजच्या स्पर्धेसाठी ‘स्वच्छ भारत’ हा विषय आला. विषयानुरूप संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, महात्मा गांधी या स्वच्छताप्रिय आदर्शांचा ठसा लेखणीतून उमटला. स्वच्छ भारत करण्यासाठी स्वतःपासूनच सुरूवात केली पाहिजे याची जाणीवही दिसली. विचारमंथन करायला लावणारी, कर्तव्याची जाण करून देणारी.. शब्दगुंफण रचनांमधून दिसली. आदर्शाप्रती वाटचालीचे लेखणीचे हे स्वप्न सत्यातही उतरो व स्वच्छ भारत साकार होवो असेच मनोमन वाटते. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏