
सरंपचाने बनावट बिल सादर करून शासनाची केली ६९ लाखांची फसवणूक
_तत्कालीन सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल_
भंडारा: जिल्ह्यातील लाखांदूर चप्राड येथील ग्रामपंचायतीत २०१३-१४ ते २०१७-१८ दरम्यान विविध कामात सामुग्री खरेदी प्रक्रियेत संगणमत करून बनावट बिलांद्वारे शासनाची ६७ लाख ९६ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याबाबत गटविकास अधिकारी मार्तंड खुणे यांच्या तक्रारीवरून चप्राड येथील तत्कालीन सरपंच धनराज गोपीनाथ ढोरे (वय ४७), कुसुम जयपाल दिघोरे (वय ४२) यांच्यासह ग्रामविकास अधिकारी गोपाळकृष्ण परसराम लोखंडे (वय ५०) व विलास पंडीतराव मुंढे (वय ४४) या चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४ पासून २०१७-१८ दरम्यान चप्राड ग्रामपंचायतीमध्ये १३ वा वित्त आयोग, १४ वा वित्त आयोगाअंतर्गत विविध विकास कामांवर लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. या निधीतून विकास कामांमध्ये उपयोगी सामुग्री खरेदी प्रक्रियेत वेळोवेळी बनावट बिल सादर करून शासन निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ग्रामपंचायतीला प्राप्त विविध करांसह सामान्य फंडासह पाणीपुरवठा योजनेच्या लाखो रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा सुद्धा आरोप तक्रारीतून केला होता.
या तक्रारीवरून भंडारा जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी चप्राड ग्रामपंचायतीकडून प्राप्त विविध विकासकामांचे लेखापरीक्षण केले. त्यात २०१०-११ ते २०१५- १६ दरम्यान १३ वा वित्त आयोगाच्या निधीतून नियमबाह्यरीत्या खरेदी करून १९ लाख ६ हजार रुपये आणि २०१५-१६ ते २०१७-१८ दरम्यान सामान्य फंडातील ३० लाख २१ हजार रुपयांची अनियमितता दिसून आली आहे.
तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी ५ लाख ७९ हजार रुपयांची अनियमितता असल्याचा ठपका आहे. पाणीपुरवठा योजनेसह अन्य विविध विकासकामांना घेऊन तत्कालीन दोन पदाधिकारी व दोन कर्मचारी यांनी संगणमत करून तब्बल ६८ लाख ९६ हजार रुपयांची अनियमितता केल्याचा अहवाल लेखा परीक्षकांनी दिला. त्यावरून जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या आदेशावरून बीडीओ मार्तंड खुणे यांनी लाखांदूर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शासनाच्या निधीचा अपहार फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीपकुमार करीत आहेत.