
पदर
‘शिर्के’ पाटलांचा वाडा नवीन नवरीप्रमाणे आज सजला होता. कारण, पंचक्रोशीत ‘शिर्के पाटील’ यांच्या नावाचा दरारा होता आणि लग्नानिमित्त गावात सर्वांना आमंत्रण होती. त्यांच्या धाकट्या मुलाचे लग्न असल्यामुळे त्यांनी आपला वाडा नवविवाहिते प्रमाणे सजवून घेतला होता. सिरीज लावल्यामुळे पूर्ण वाडा आकाशातील चांदण्याप्रमाणे लुकलूक करीत होता. त्यामुळे त्या वाड्याच्या शोभेत अजूनच चार चांद लागले होते.भव्य मंडप, त्यामध्ये टाकलेल्या गादीवरील पांढऱ्या शुभ्रचादरी, लोड, स्वागतासाठी अत्तराणी भरलेले फवारा मशीन, गुलाबाची फुले, पाहुण्याच्या जेवणासाठी चांदीची ताट, पेले आणि जेवणात भरपूर पदार्थ… आता पाटील म्हटलं तर घरातील बाया म्हणजे पाटलीनी..!!
त्यासुद्धा मस्तपैकी नऊवारी, नाकात मोत्याची नथ, भाळी चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या त्यात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात मोहनमाळ, एकदाणी, अजून गळाभर दागिने त्यामध्ये भरीस भर डोक्यावर पदर…!! खरंच पाटलीनी शोभत होत्या..आणि डोक्यावर पदर गावात त्याला शेव म्हणतात..(या शेवाचे पण बरेच किस्से आहेत..) म्हणजे तिथल्या पाटलांची आब होती.त्या बाईला खऱ्या अर्थानी ही खानदानी बाई आहे असे बोलायचे.आता खानदानी पाटलीनी मध्ये, पाटलांची मोठी सून सुंदरशी पैठणी आणि पूर्ण साज करून आली खूप सुंदर दिसत होती ती …!! पण त्या तिच्या सुंदर दिसण्यावर लगेच कुजबूजीच्या पिचकाऱ्या उडायला लागल्या कारण तिने डोक्यावर पदर घेतला नव्हता ना..!!
“काय बाई ही पाटलाची मोठी सून ना ओ… काई आब रितभात आहे का नाई बापा या पोरीले.? साऱ्या बायकाचे डोसक्यावर पदर हाय! अन् ही पहा चाल्ली आपली पाठ उघडी करून. काय सांगाचं बापा आताच्या पोरीयले.मले पहा न फ़ुलं वाहा..!सासूनं सांगतल नाय काय बाई इले..” असा संवाद सुरू असताना, अचानक तिच्या मामे सासूबाई तिला म्हणाल्या, ‘का ग साक्षी तू डोक्यावर पदर नाही घेतलास? ‘बघ काय म्हणत आहे तुला?’ जरा पदर वगैरे घे डोक्यावर ! नाहीतर तुझ्या सासू सासऱ्याचा काय मान राहील?’ त्यावर साक्षीने काही उत्तर न देता तेथून जाणेच मान्य केले. तसेच साक्षीच्या सासूचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे गेले आणि लगेच त्यांनी साक्षीची बाजू घेऊन बोलल्या, ‘तिला सवय नाही साडीची. आजकाल कुठे मुली नेसतात ही साडी आणि ही नऊवारी तर नाहीच नाही, जरा नवीन विचारांनी पण चालावं लागतंय..आणि तुमची मुलगी नाही का ? ती कुठे नेसते हो साडी वगैरे. मग आपली सून म्हणून काय झालं तिला सुद्धा आपण निभवून घायला हवं.’
साक्षीला आपल्या सासूचे बोलणे कळले आणि मग तिने तो पदर डोक्यावर जमत नव्हते; पण तोच पदर तिने चोपून चापून दोन खांद्यावर घेतला.
सासूचा सुद्धा मान तिने ठेवला होता. ती एक मोठ्या कंपनीत मुंबईला जॉब करीत होती. रोजच लोकलनी जाणे येणे, धावत पळत लोकल पकडायची आणि वेळेचा अभाव त्यामुळे सलवार सूट किंवा जीन्स घातला की सर्व कसं पटापट आवरतं आणि आरामदायक सुद्धा वाटतं. मग कशी अपेक्षा करायची आपण या एकविसाव्या शतकातील वावरणाऱ्या स्रीसाठी..!! आता ती एका हाताने कंप्युटर सांभाळेल आणि दुसऱ्या हाताने पदर सांभाळत बसेल? सांगायचं तात्पर्य हेच की बाईंनी पदर असलेली साडी नाही नेसली तर तिला किती नावं ठेवायची ?.आणि ही पदर नसलेली साडी म्हणजेच सलवार कुर्त्यातील, जीन्समधील वेळप्रसंगी मिडीतील सुद्धा स्री म्हणजेच एकविसाव्या शतकातील मॉडर्न स्री …!!
आता साक्षीने एका खांद्यावरील पदर दोन खांद्यावर घेतला. म्हणजेच तिने मन मारून कुणाचा तरी मान राहावा म्हणून घेतला. म्हणजेच यामध्ये तिची किती इच्छा होती की छान झालेल्या तयारीमध्ये तो दोन खांद्यावरील पदर कुठेतरी अडसर ठरतो आहे किंवा मी केलेल्या या हेअर स्टाईलचं काय ? हे जर तिला वाटत असेल तर मग कशाचा त्यामध्ये मान आला. उलट तिच्या भावनांचा कोंडमारा झालाय. डोक्यावरील पदर म्हणजे स्री ही शालीन आहे कुलीन आहे. ही परिभाषा पण एकविसाव्या शतकातील स्रीला हे सर्व शक्य आहे का ? कदाचित असेलही पण डोक्यावर पदर म्हणजे काकूबाई , आजीबाई..!! या ऐकण्यातून जाऊन कान बहिरे करावे लागतील.मलाही पटतं डोक्यावर पदर म्हणजे स्री ही खूप रुबाबदार दिसते. राजकारणी बाई असेल तर, याची पण सवय असायला हवीच. कारण तिला यामधून आपली प्रतिमा लोकांसमोर ठेवायची असते इतकं महत्व या पदराला आहे. आता पदराचे प्रकारचं किती असावे ? ते इथे सांगणे शक्य नाही. पण मला असं वाटतं, आजच्या स्रीला सलवार सूट किंवा लेगीन, जीन्स मध्ये वावरायला आवडते म्हणून तिने आपल्या मर्यादा, जबाबदाऱ्या टाळल्या नाहीत. ती एक जबाबदार आई,पत्नी व सून आहे, हे ती त्या आधुनिक पेहरावातही उत्तमपणे निदर्शनास आणून देते. खोटानाटा आव आणून तर करीत नाही ती.सर्वांची काळजी घेते, मुलांचे नीट संगोपन करते, आपला स्वतःचा जॉब करून मुलांना शाळेत , खेळायला सोडणे हे सर्व सोयीस्करपणे या कपड्यात वावरून ती करीत असते. मग हा जीन्स चाच पदर त्या आपल्या चिमुकल्याला आधार देत असते. युद्धावर जर स्री डोक्यावर पदर घेऊन, घोड्यावर बसून निघाली, तर ती आधी पदर खोचून निघत असेल. कारण तो पदर सांभाळताना तलवारीकडे दुर्लक्ष्य करून चालत नव्हते आणि पदर खोचून आलेली बाई म्हणजे जरा आक्रमकच वाटते ना..!
जुन्या काळी किंबहुना आजही, काही कुटुंबात डोक्यावर पदर घेण्याची रीत आहे आणि ती रीत परंपरागत सुरू आहे. कारण त्या पदराखाली कितीतरी भावना ,प्रेम,मान आणि कितीतरी गुपित दडलेली असते. दुःख याचे वाटते आई जेव्हा आपल्या मुलाचे तोंड त्या पदराने पुसते किंवा मुलं आईच्या पदराला टॉवेल असून सुद्धा हात पुसतात किती मायलेकाची माया, प्रेम दडलेलं आहे त्या पदराखाली..!! मी स्वतः सुद्धा हा अनुभवातून आलेले आहे. पदराला दहा ठिकाणी पिना लावून कसेतरी निभवायचे हळूहळू सवय होऊन गेलेली..खूप सर्कस व्हायची. कारण आमचं पण घर राजकारणी..!! खूप लोकांचा राबता रहायचा आणि सर्वांचा मान ठेवावा लागत होता. मग काय माझी मात्र फजिती व्हायची. पण तीच मी आता आधुनिक पेहरावात वावरते. कारण मला त्यात आरामदायक वाटते. त्याला तोडीस तोड म्हणजे आधुनिक पदर नसलेल्या पेहरावातील स्री सुध्दा आपल्या मर्यादा राखून तितकंच प्रेम, माया आपल्या मुलांवर , कुटुंबावर करते. तेव्हा आपल्याच ठरवायचे आहे कोणता पदर बरा.
रेखा सोनारे
लेखिका,कवयित्री, नागपूर
=======