
लळा लागला जिवा..!
आम्ही सर्व रात्रीच्या जेवणाला बसलो होतो. टी.व्ही.पाहत गप्पा मारत जेवण सुरू होते. रात्र जसजशी आगेकूच करू लागली. तशा भरपूर पावसाच्या सरी कारंज्या सारख्या पडू लागल्या. अकरा वाजता अंग पलंगावर टाकताच डोळा लागला. रात्री एकच्या दरम्यान बाहेर कसलीतरी चाहूल जाणवली. कदाचित कुत्रीचा आवाज असावा काय करावं ते नीट कळेना? वेळ रात्रीची असल्यामुळे बाहेर सुध्दा जाता येत नव्हतं, पुन्हा झोपी गेले. पहाटे दार उघडताच कुई कुई आवाज ऐकू येऊ लागला. जवळ जाऊन बघताचं.. बापरे…! घराच्या वाॅलकंपाऊडला लागूनच असलेल्या झुडूपाच्या सिंमेटच्या कॅरीला व विद्युत पोलच्या आधाराने एका कुत्रीने सात पिल्लांना जन्म दिला होता. पावसाचे मध्ये मध्ये येणे सुरूच होते. आम्ही दोघेही पती पत्नी विचारात पडलो आता काय करायचं? सकाळची वेळ असल्यामुळे प्रथम आम्ही दोघांनी चहा घेतला. दोन तीन बांबू व मोठे प्लास्टिक घरीच होते. बांबू व भिंतीच्या साहाय्याने प्लास्टिक बांधून पिल्लांकरीता मजबूत निवारा तयार केला. बाहेर पिल्लांच्या आईला निघता येईल एवढा रस्ता ठेवला. पावसांचा मारा त्यांना लागणार नाही याची काळजी घेतली. दररोज दुध-भात, पोळी तिन्हीसांजेला मी द्यायचे. पावसाचे वातावरण त्यातच दोन दिवसांची पिल्लं. हे वातावरणाला सोसवेना. रात्रीच्या अंधारात बाहेरील कुत्र्याने एक पिल्लू पळवून नेले. आईचे ओरडणं ऐकून आम्ही बाहेर येताच पिल्लू घेऊन पळताना ते दुसरे कुत्रे दिसले, पाठलाग केला. पण, आमच्या दुप्पट वेग त्या बाहेरील कुत्र्याचा होता.
पिल्लांच्या आईच्या डोळ्यात अश्रू ओघळत होते. पिल्लांना वाचविण्याच्या प्रयत्नांत ती सहा पिल्ले भिंतीशी ठेवून समोर ती बसली. तिच्या वजनानी तसेच पिल्यांना श्वास घेण्यास कदाचित अडथळा होत असावा. यातच तीन पिल्ले पुन्हा दगावली. या सर्व प्रसंगाचे आम्ही त्याचे साक्षीदार होतो. कुत्री आई मला व माझ्या पतीला स्वत:चे संरक्षणकवच समजून काहीच करत नव्हती. ती मेलेली तीन पिल्ले बाहेर काढू देईना कसेबसे दुधभाताचा वाटा तिच्या तोंडाजवळ नेऊन तिला बाहेर येऊ दिले व दगावलेली पिल्ले बाहेर काढली. तिचे नंतर कुई कुई आवाज व शोध घेणे सुरूच असायचे. पिल्लांना दूर नेऊन जमिनीत खड्डा करून पुरली. त्यावर अश्रूची फुले वाहिली.
कुत्र्यांच्या पिल्लांचे डोळे उघडायला ७-८ दिवस लागतात. नियमित त्यांना जेवण देणे सुरूच होते. आता फक्त तीन पिल्ले राहिली होती. त्यांची आम्ही नीट काळजी घेत होतो. काही दिवसांनी पिल्लांचे उघडलेले डोळे बघून आनंद झाला. पंधरा दिवसांनी पिल्ले हळूहळू बाहेर पडू लागली. जास्त बाहेर गेल्यावर आई कुत्री त्यांना आपल्या हलक्या दातांनी हळुवार पकडून बांधून दिलेल्या घरात घेऊन यायची. एका महिन्यानंतर आई व तिची पिल्ले दूर अंतरावर असलेल्या मोठया पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसू लागली. हे घर आता कदाचित नको असावे, म्हणून आम्ही दोघांनी बांधलेले बांबू काढून टाकले. पिल्ले आता तीन महिन्यांची झालीत. जवळ जाताच पाया पायाशी घिरट्या घालतात. पण आई त्यांना आपल्या स्वत:च्या पायानी मायेने दूर लोटण्याचा प्रयत्न करते. ‘म्हणत असावी,’ की त्यांना त्रास देवू नका. पण हा पिल्लांचा खेळ आम्हाला सुद्धा आवडायला लागला’. म्हणूनच रमतो आम्ही कधी कधी मुद्दाम तेथे जाऊन.. लळा लागला जिवा..!
कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, नागपूर