
‘शिणलेल्या पापण्यात कसलं बरं स्वप्न असावीत?’; प्रा तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेचे परीक्षण_
प्रखर लखलखाट असो व रात्रीचा तिमिर..ज्यांच्या भाग्यात नसतोच कधी समीर..चैतन्याचे हे छोटे कोंब शाळेच्या आवारात उड्या घेत बहरण्याऐवजी रस्त्याच्या कडेला कुठल्यातरी उभ्या असलेल्या रिक्षाच्या कडेला रेलून..दारिद्र्याच्या भयाण शापाने ग्रासून..कधी महानगराच्या वस्त्यांमधून तर कधी पुलाखालच्या रस्त्यांवरून..ऊन, पाऊस,वादळात काळवंडलेल्या चर्येने..कधी पाय मुडपून..कधी हातावर डोकं ठेवून, खोल गेलेल्या, मलूल झालेल्या,अर्ध मिटलेल्या नेत्रात..भूकेच्या वेदनेने व्याकुळ होऊन..हे अनघड बालपण अर्ध कपड्यात कुठेतरी शून्यात नजर रोखून,कधी स्वतःशीच स्मितहास्य करत..पहाटेची स्वप्न डोळ्यात घेऊन..कधी गगनचुंबी इमारतीकडे बघत तर कधी रंगीबेरंगी दुनियेच्या आरासीकडे बघत,तर कधी पावभाजी विकणाऱ्या दुकानाकडे बघत, पैशाअभावी केवळ पावभाजीच्या वासानेच पोट भरत.. कधी सुरू झालेल्या शाळेच्या घंटा नादाचा रव ऐकत..शाळेपासून वंचित..या शिणलेल्या पापण्यात कसलं बरं स्वप्न असावीत? की नसावीत?
आ. सरांनी दिलेले हे बेघर,अनौरस भिकारी मुलं,शिक्षणापासून वंचित असणाऱ्या या मुलांचं चित्र बघितलं नि वेदनेची कळ उमळली छातीत.. पण फक्त ‘कळच’ ती..आपलं मन ‘वळतं’ कुठे त्यांना हात द्यायला..नि या दारिद्र्याच्या शापित गर्तेतून बाहेर काढायला..ना उच्चभ्रू समाजाचा,ना शासनाचा..आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या गौरवशाली विकासानंतरही या वंचितांना शिक्षण नाही, जात धर्म परंपरेच्या पल्याड असणारी ही बेघर मुले..आधार कार्ड नाही. डोईला छप्पर नाही..महायुद्धानंतर बेकारी ज्यांच्या वाट्याला आली,ती पिढीजात अजूनही सुरूच आहे..ह्या वंचितांच्या वेदनांशी कुणाचीच नाळ जोडली गेली नाही..
ज्या देशाचं बाल्य उपेक्षित तो देश मागास समजला जातो. अन्नापासून, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या अनाथ लेकरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. आभाळाखाली असणाऱ्या वंचितांना मायेचं आभाळ व शिक्षणाचं आभाळ मिळालं पाहिजे..वंचित विकास कार्य अपेक्षित..त्यासाठी सामाजिक राजकीय इच्छाशक्तीने पुढाकार घेणे तेवढेच गरजेचे आहे..अनाथांच्या जातीला भावनिक समृद्धी आवश्यक..यांचं पुनर्वसन कार्य, संगोपन, शिक्षण ,सुसंस्कार देण्यासाठी, बालहक्काच्या अंमलबजावणीसाठी समाज व शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे..यांचं शैक्षणिक बालपण हरवू नये..’यांचं वंचित जीणं सुरक्षित व बाल्य समृद्ध होईल तो सुदिन’ ..
प्रत्येकाने सामाजिक वा नैतिक कर्तव्य समजून यांना स्नेहाची ऊब दिली तर त्यांना या ‘दशेपासून नक्कीच नवी दिशा मिळेल’..कारण यावरच आपल्या देशाचे उद्याचं भविष्य दडलेले आहे.देशात अनेक अब्जाधिश आहेत, त्यांच्या संपत्ती सामर्थ्यातून या बालकांना अनुरक्षण गृहे,बालगृहे बांधून व शिक्षण देऊन रोजगार देऊ शकतील.व यांच्या वंचितावर स्वतःच्या सत्कर्माचे संचित कोरू शकतील.
आज शाळेची घंटा वाजली पण परिस्थितीच्या भयावह घंटानादापुढे ही लाचार बालके..गरिबीची लक्तरे अंगावर ओढून..जिणं शोधण्यासाठी मुक्या मनाने जीवनाच्या वाटांकडे व आभाळाकडे पाहणाऱ्या या निरागस मुलांच्या वेदनांचे आशारूपी हुंकार काव्यात उमटावेत म्हणून आ. राहुल सरांनी हे हृदयस्पर्शी चित्र कदाचित दिलेलं..यावर लेखन केलेल्या सर्व सारस्वतांचे अभिनंदन💐💐 असेच लिहिते व्हा. आ. राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिलीत, त्याबद्दल आपले हृदयस्त ॠणाभार🙏🙏
प्रा तारका रूखमोडे, गोंदिया
मुख्य परीक्षक सहप्रशासक संकलक
मराठीचे शिलेदार समूह