
किल्ले दौलताबाद
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद हे गाव. याच गावात देवगिरीच्या यादवांचा ऐतिहासिक किल्ला आहे. याची उंची २९७५ फूट आहे. या किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सात आश्चर्यांमध्ये दोन किल्ले येतात. त्यातील एक म्हणजे राजगड व दुसरा दौलताबाद हा होय. रामदेवराय यादवांपासून निजामापर्यंत अनेकांचे कारभार अनुभवत, सुखदुःखाचे स्पंदन जाणत हा किल्ला उभा आहे. यादव राजा भिल्म पंचम यांनी बाराव्या शतकात याचे बांधकाम सुरू केले होते. १३०८ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने हे शहर ताब्यात घेतले. १३२७ मध्ये दिल्ली सल्तनतच्या महंमद बिन तुघलकने देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद असे केले व आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली. पुढे १३३४ मध्ये त्याने हा निर्णय मागे घेऊन पुन्हा दिल्ली येथे राजधानी नेली.
दक्षिणेच्या प्रवेशद्वारावरच हा किल्ला उभा असल्याने त्याचे एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे. तटबंदीची लांबी सुमारे पाच किलोमीटर आहे. किल्ल्याचा डोंगर ६०० फूट उंचीचा असून त्याभोवती पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून १५० ते २०० फूट उंचीचा कातळ इतका तासून काढला आहे की त्यावरून सापालाही वर जाणे शक्य नाही. किल्ल्याच्या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला चांदमिनार नावाचा मनोरा आहे. बहामनी राजा हसन गंगू या राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनो-याची उंची २१० फूट आहे. याला एकूण चार मजले असून पायाचा परीघ ७० फूट आहे. येथूनच डाव्या बाजूला १८० स्तंभाचे हेमाडपंथी मंदिर आहे लोकांनी येथे उत्स्फूर्तपणे भारतमातेची मूर्ती बसवली आहे. मंदिरासमोरच पुढे १५० फूट लांब व १०० फूट रुंद ‘हत्ती हौद’ नावाचा विस्तीर्ण जलाशय आहे. येथून पुढे थोडे उंचीवर गेल्यावर पंचधातूंनी बनवलेली मेंढा तोफ नावाची एक तोफ आहे. विविध कोट म्हणजे.. अंबरकोट.. सामान्य माणसे राहत असत, महाकोट.. उच्च सामाजिक लोकांसाठी, कलाकोट..शाही रहिवासी क्षेत्र, बालाकोट.. हे गडाचे शिखर जेथे ध्वज फडकवला जातो. तसेच या किल्ल्यावर शत्रूला गोंधळात टाकणारी खोटी दारेही आहेत. बारादरी ही १३ मोठमोठ्या खोल्या असणारी शाही इमारत, चिनी महल हा कैदखाना, रंगमहल, भद्रा मूर्ती मंदिर इत्यादी गोष्टी पाहता येतात. मुख्य गडावर जाण्यासाठी एकावेळी जेमतेम दोन माणसे जाऊ शकतील अशी अरूंद पुलासारखी वाट आहे. गडावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.
रस्तेमार्गाने बसने किंवा खाजगी वाहनाने येथे जाता येते. रेल्वेमार्गासाठी औरंगाबाद हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. औरंगाबाद येथे विमानाने येऊन तेथून बस किंवा खाजगी वाहनानेदेखील जाता येते. दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत किल्ला पाहता येतो.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
========