
‘….आणि साद अंतरीची अंतःकरणात पोहोचली..!; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
मला आठवते अजूनही १४..१५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक कुटुंब राहायला आले होते. त्यांना चार-पाच वर्षाची एक मुलगीही होती.पण मी पाहत होते,आले तेव्हापासून नवरा बायको दोघांमध्ये सतत कुरबुर,भांडण,कधीकधी मारहाण अगदी नित्याचेच होते.पण कुणाच्या संसारात कसं बरं दखल घेणार?..म्हणून मी नेहमीच दुर्लक्ष करायचे.एके दिवशी ती स्वतःहूनच मला म्हणाली,ताई बघताय ना? किती त्रास देतात हे मला.मी सहज म्हटलं तिला,अगं तुझेही काही चुकत असेल, जरा आत्मपरीक्षण कर आणि सावर स्वतःच्या संसाराला.त्यावर तिने मनमोकळे करण्याच्या उद्देशाने असेल कदाचित पण मला म्हटलं,नाही हो ताई तसं काही नाही….मी गरोदर आहे,नुकतीच यांनी गर्भनिदान चाचणी केली माझी. माझ्या उदरात कन्यारत्न आहे पण यांना दुसरा मुलगा हवा होता म्हणून गर्भपातासाठी माझा छळ सुरू आहे. परंतु मला नाही करू द्यायचे हे पाप…मी सुन्न झाले.
उमलणाऱ्या कळीला उमलण्यापूर्वीच कुरतडणाऱ्या, कुस्करणाऱ्या या मानव प्रजातीला त्या आईच्या भावना कशा कळणार??
आर्त किंचाळून अंतरातून ती साद घालते. पण मुलगाच वंशाचा दिवा मानणाऱ्यांच्या कानात ती किंचाळी कशी बरं शिरणार ?
अशा एक ना अनेक प्रश्नांसह मी फक्त तिच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिले.
अश्रू जगात विरली
गाथा जुन्या खुणांची…. ओठावरती मिटली
ती साद अंतरीची….
साद अंतरीची….
खरंतर ही साद म्हणजे
..आर्जव,हाक,विनंती मनापासूनचे मागणे..या अनेक अर्थाने वापरावयात आलेला शब्द.
तू म्हणजे छान मैत्री
तू म्हणजे पावसाळ्यातली छत्री
तू म्हणजे रातराणीचा सुगंध तू म्हणजे मनाची अवस्था बेधुंद.
तू म्हणजे मधुर संगीत
तू म्हणजे माझ्या जय विजयाचे गणित
अशा अनेक उपमांनी सजलेलं प्रियकर,प्रियसीचे ते प्रेम… मात्र या प्रेमाला नेहमीच किनार असते ती साद अंतरीची.
आतुरता असते तिला मिलनाची….ती एकटक त्याच्याकडे पाहत होती..
डोळ्यात आर्जव होतं आणि उत्सुकताही होती. मिलनाची…तोही जरा खट्याळच होता…
अधून मधून तिच्याकडे पाहत आनंदांश्रूंनी तिला भिजवत होता.
होय …. अवनीला आणि वरुणला मिलनाची उत्सुकता होती. शेवटी मेघ बरसलेत आणि अवनीला तृप्त केलं.ती नखशिखांत भिजली आणि अवनीची साद अंतरीची अंतःकरणात पोहोचली..
वारी…. महाराष्ट्राची एक गौरवशाली परंपरा.
“पाऊले चालती पंढरीच्या वाटे”ना तहान ना भूक…ना पाऊस ना वारा… साद अंतरीची घालून फक्त पांडुरंगाच्या दर्शनाचीच ही ओढ असते आणि एकदा का पांडुरंग भेटला की त्याला डोळ्यात साठवत जन्मोजन्मीच पुण्य सार्थकी लागल्याचा भाव मनी असतो.
अशा या साद अंतरीच्या या आगळ्यावेगळ्या विषयाला आज हात घातला तो काव्यमैफील सजवण्यासाठी…बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी.. ‘साद अंतरीची’हा विषय दिला आणि या विषयाला अनुरूप अनेक सुंदर अशा रचनांचा पाऊस पडला.
साद अंतरीची लिहितांना कुणी सखी साठी व्याकुळ झाले तर कुणी त्याच व्याकुळ मनाने प्रियकराला साद घातली. कुणी काळजाला भिडणारी साद अंतरीची विशद केली तर कुणी विठुरायाला, पांडुरंगाला अंतरीची साद घातली. कुणी हरवलेल्या हरीस शोधण्यासाठी साद अंतरीची घातली तर कुणी जीवनाच्या गरजेची जाणीव करून देतांना साद अंतरीची खूपच छान रेखाटली. तेव्हा तुम्हा सर्व काव्य सारस्वतांचे मनापासून अभिनंदन व पुढील काव्य प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा.💐💐💐
सौ सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका