
@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*कांगारूंचे लॉर्ड्सला रिंगण*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
*ॲशेसच्या दुसऱ्या कसोटीत कांगारूंनी यजमान इंग्लिश संघाला धूळ चारत मालिकेत २/० अशी आघाडी घेतली आहे. लॉर्डसवर झालेल्या दुसऱ्या लढतीत पाचही दिवस कांगारूंनी इंग्लिश संघाला दबावात ठेवत सामना आपल्या नावे केला आहे. चौथ्या डावात कर्णधार बेन स्टोक्सने झुंजार खेळी करत दिडशतक झळकावले परंतु तो त्याच्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. ऑसींच्या मजबूत फलंदाजीचे आणि शिस्तबद्ध गोलंदाजीचे चक्रव्यूह तोडणे इंग्लिश संघाला जमले नाही आणि लागोपाठ दोन कसोटीत त्यांना पराभव पत्करावा लागला.*
*झाले काय तर पहिल्या कसोटीत काठावर पास झालेल्या कांगारूंनी दुसऱ्या कसोटीत गोलंदाजी आणखी धारदार करण्यासाठी त्यांचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्कला संघात घेतले तर इंग्लंडने मोईन अली ऐवजी जोश टंगला स्थान दिले. दोन्ही संघ कागदावर तुल्यबळ दिसत असले तरी कांगारूं संघ डावपेचात वरचढ ठरले. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा पहिले गोलंदाजीचा निर्णय वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने त्यांच्यावरच उलटवला. जवळपास चार च्या सरासरीने धावा करत त्यांनी पहिल्या डावात चारशेची धावसंख्या उभारली. इथेही जेम्स ॲंडरसन स्टुअर्ट ब्रॉडची गोलंदाजी निष्प्रभ ठरली.*
*प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात झकास झाली. क्राऊली, ओली पोप, डकेट आणि हॅरी ब्रुकने डाव रचला परंतु शेवटचे पाच फलंदाज अवघ्या चाळीस चेंडूत सेहेचाळीस धावांत गुंडाळले गेले. पुन्हा एकदा ऑसी संघाला ९१ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. ऑसींच्या दुसऱ्या डावात मात्र ब्रॉड, रॉबिन्सन, जोश टंगने नियंत्रित मारा करून कांगारूंना तिनशेच्या आत रोखले. गोलंदाजांनी इंग्लंडला सामन्यात थोडीफार आशा दाखवली होती आणि ३७० चे लक्ष्य कठीण जरूर होते मात्र अशक्यप्राय नक्कीच नव्हते. सोबत गरज होती वरच्या फळीतील फलंदाजांनी आपले योगदान देण्याची.*
*मात्र इंग्लंडचा दुसऱ्या डावाची सुरूवात डळमळीतपणे झाली. चार बाद पंचेचाळीस धावा अशा दयनीय स्थितीत असताना कर्णधार बेन स्टोक्सने मैदान सांभाळले. त्याने डकेट सोबत १३२ धावांची तर स्टुअर्ट ब्रॉडसोबत १०८ धावांची दमदार भागीदारी केली. स्टोक्स इंग्लंडला पैलतीरी नेणार असे वाटतांनाच तो बाद झाला आणि उर्वरित इंग्लिश फलंदाज कांगारू गोलंदाजांपुढे तग धरू शकले नाहीत. डकेट आणि स्टोक्सने इंग्लंडच्या आशा पल्लवीत केल्या होत्या परंतु कांगारूंनी डावपेचात कुरघोडी करत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले.*
*महत्वाचे म्हणजे इंग्लंडला जिंकायला जेवढ्या धावा हव्या होत्या नेमके तेवढीच षटकं सामन्यात बाकी होती. ज्याप्रमाणे स्टोक्स आणि ब्रॉड खिंड लढवत होते ते पाहता काहीही शक्य होते. तसेही स्टोक्स हा मोठ्या स्टेजचा खेळाडू आहे. यापूर्वी त्याने २०१९ ला ॲशेस मालिकेत नाबाद १३५, २०१९ एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात किवी विरूद्ध नाबाद ८४ आणि गत टी ट्वेंटी अंतिम सामन्यात पाकविरुद्ध ५१ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे स्टोक्सच्या खेळीकडे अख्खा इंग्लिश संघ डोळे लावून बसला होता. मात्र चतुर कांगारूंनी इंग्लिश फलंदाज बाद करण्याऐवजी धावा रोखण्याची अनोखी रणनिती रचली.*
*स्टोक्सचे चौकार, षटकार आणि पुलचे फटके नियंत्रित करण्यासाठी ऑन आणि लेग साईडला क्षेत्ररक्षकांची भक्कम तटबंदी उभारली. केवळ एकेरी धावांनी स्टोक्स, ब्रॉड जोडीवर दबाव वाढत गेला आणि त्याची परिणती स्टोक्सच्या बळीत झाली. कांगारू गोलंदाजांनी गुडलेंथ, शॉर्ट लेंथवर गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना जखडून टाकले होते. खरेतर साठ सत्तर धावांसाठी तितकीच षटकं खेळून सामना जिंकणे किंवा अनिर्णित ठेवणे यापेक्षा स्टोक्स ने आक्रमकतेने कांगारूंचा सामना केल्यास त्यांची जिंकण्याची शक्यता जास्त होती. मात्र क्रिकेट मध्ये जर तर च्या गोष्टींचा काही फायदा नसतो.*
*अखेर कांगारूंनी ४३ धावांनी इंग्लंडवर मात केली. पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथचे जिगरबाज शतक कांगारूंना फ्रंटफूटवर घेऊन गेले. जवळपास तेरा वर्षापूर्वी लॉर्ड्सला डेब्यू करणारा स्टीव्ह स्मिथ प्लेअर ऑफ दी मॅच सोबतच लॉर्ड ऑफ लॉर्ड्स ठरला. सध्यातरी स्मिथच्या फलंदाजीला जगभरात तोड आहे असे वाटत नाही. कसोटीला हवे असणारे टेम्परामेंट, डिटरमिनेशन यासोबतच नेहमी धावांची भुक त्याच्या खेळीत दिसून येते. भरीस भर म्हणून त्याच्या फलंदाजीत टिपीकल ऑसी टच नजरेस येतो. धीरोदात्तपणे फलंदाजी आणि टिच्चून गोलंदाजी करत कांगारूंनी लॉर्ड्सला रिंगण घातले आणि ते सुद्धा दुसऱ्या डावात नॅथल लायन गोलंदाजीला उपलब्ध नसतांना.*
*********************************
दि. ०३ जुलै २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++