सूर संतूर बरसात’; निनाद दैठणकर यांची मैफल

‘सूर संतूर बरसात’; निनाद दैठणकर यांची मैफलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: कुठे पाऊस धारा जोरात कोसळत आहेत तर कुठे अगदीच पाऊस नाही. अशा स्थितीत पावसावर काहीशा नाराज असलेल्या पुणेकरांची एक संध्याकाळ मात्र सूरांच्या बरसातीत न्हाऊन निघाली. ‘इन्फ्निटी’ प्रस्तुत गुणी कलाकार श्री. निनाद दैठणकर यांच्या संतूर वादनाच्या सूरांची ही बरसात, अनुभवता आली. बालशिक्षण मंदिर सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास ‘कीबोर्ड’- श्री.राहुल कुलकर्णी आणि तबला- विनित तिकोणकर यांची संगीत साथ लाभली.

राग यमन कल्याण मिश्रीत ‘यूँही पेहलूमें बैठे रहो’ ही गझल आणि ‘मोह मोह के धागे’ या चित्रपट गीतांच्या सूरावटीने मैफलीचा लयबध्द शुभारंभ झाला. आर. डी. बर्मन यांची गाणी म्हणजे रसिकांचा काळजातील ठेवा. त्यांचा एक छानसा गुलदस्ता करून संगीताच्या समधूर काळाची सफर घडवणारी ‘रात कली एक ख्बाबमें आयी’, ‘सामनेवाले खिडकीमें’ ‘हमसे सनम क्या परदा’ ‘रिमझिम गिरे सावन’ ‘दो लब्जोंकी है ये दिलकी कहानी’ ही एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी रसिकांना खिळवून ठेवणारी होती.

सुफीयाना संगीतात सहायक वाद्य म्हणून वाजवले जाणारे हे अदभूत तंतूवाद्य पं. शिवकुमार शर्मा यांनी अनेक बदल करून आधुनिक स्वरूपात घडवले,हे सर्वश्रुत आहे. प्रचंड लोकप्रिय असे हे वाद्य देशविदेशात प्रेमाने ऐकले जाते. सिने संगीतात संतूरचा वापर म्हणजे गाणे हमखास लोकप्रिय होण्याची हमी. पर्शियनभाषेतील ‘संतूर’ हे नाव प्रचलीत असले तरी प्राचीन संगीत ईतिहासात याला शंभर तारांचे वाद्य म्हणून ‘शततंत्री वीणा’ असे नाव होते.

कार्यक्रमात पुढे ‘राग देस’ या पावसाळी रागात बांधलेली एक धून पेश करून ही मैफल मराठी गीतेही छेडून गेली. ‘का रे अबोला’…’रूपेरी वाळूत’ नजाकतीने सादर झाली. यानंतर द्रूत लयीतील उपशास्त्रीय धून अप्रतिम तबला साथीने रंगत गेली. सभागृहात उपस्थित तरूणांसाठी ‘ कल हो ना हो’ ‘तुमको पाया है तो जैसे..’ अशी काही नविन गाणी खास सादर करण्यात आली.

निनाद दैठणकर हे शास्त्रीय कंठसंगीताचे साधक असून सूरांवर त्यांची हुकूमत सिध्द करणारी
“रेन ड्राॅप” या संकल्पनेवर आधारीत त्यांनी स्वतः कंपोज केलेली सूरावट अक्षरशः पावसाचा अनुभव देऊन गेली. मैफलीचा समारोप प्रसिध्द संगीतकार जोडी ‘शिवहरी’ यांच्या ‘सिलसिला’ सिनेमातील गाजलेल्या ‘देखा एक ख्वाब’ हे गाण्याची श्रोत्यांमधून आलेली फर्माईश पूर्ण करून ‘इजाजत’ मधील ‘मेरा कुछ सामान’ या भावतरल गाण्याने संपन्न झाला.

या प्रसंगी प्रायोजक ‘गंगाधर मिठाई’ यांच्या वतीने कलाकारांचा सत्कार करण्यात आला. निनाद यांचे वडील शास्त्रीय गायक पं दैठणकर आणि प्रसिद्ध कलावती आई सो. स्वाती दैठणकर यांच्यासह शहरातील डाॅक्टर, व्यावसायिक अवा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाद्यसंगीताने मनाला एक अनाहत शांती आत्मिक पातळीवर खोलपर्यंत अनुभवास येते “सुकून” या यथार्थ नावाने प्रस्तुत या मैफलीने ” सूर.. संतूर ” चा हा विलक्षण प्रत्यय रसिकांच्या ओंजळीत घातला. या निमित्त एक संध्याकाळ सूरमयी होवून उपस्थितांच्या हदयात कायमची घर करून बसली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles