
‘इंग्लंड संघाने भाकरी फिरवली’; डॉ अनिल पावशेकर*
भाकरी फिरवण्याच्या नादात महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाची शकले झाली असली तरी इंग्लिश क्रिकेट संघाला ही युक्ती चांगलीच फायद्याची ठरली आहे. बहुचर्चित ॲशेस मालिकेत आपल्याच मैदानावर पिछाडीवर असलेल्या इंग्लिश संघासाठी मालिकेत करा अथवा मरा अशी स्थिती झाल्याने तिसरा कसोटी सामना जिंकणे आवश्यक होते. याठिकाणी इंग्लिश संघाची गोलंदाजी ही मुख्य डोकेदुखी होती. ॲंडरसन, स्टुअर्ट ब्रॉड जोडीला कांगारूं संघ भीक घालत नाही हे दिसताच त्यांनी ॲंडरसन सहीत आणखी दोन खेळाडूंची भाकरी फिरवली आणि इंग्लिश संघाने मालिका जीवंत ठेवली.
खरेतर ॲशेस मालिका दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची लढत असते. त्यातच कांगारूंनी कसोटी अजिंक्यपद मिळवल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. कागदावर जरी दोन्ही संघ तुल्यबळ भासत असले तरी कांगारूं संघ कांकणभर सरस वाटत होता आणि हे त्यांनी पहिल्या दोन कसोटी जिंकून दाखवून दिले होते. चॅम्पियन संघ या नावारूपाला जागत त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि डावपेचात इंग्लिश संघाला पछाडले होते. यामुळे कांगारूंशी टक्कर द्यायला इंग्लिश संघाने तब्बल तीन बदल केले. अनुभवी ॲंडरसन, ओली पोप आणि जोश टंग ऐवजी तिशी पार केलेले परंतु अजुनही दमखम बाकी असलेले मार्क वुड, ख्रीस वोक्स आणि मोईन अली यांना संघात घेतले.
चाळीशी गाठलेला आणि पाऊने सातशेच्या वर कसोटी बळी टिपलेला जेम्स ॲंडरसन कितीही अनुभवी गोलंदाज असला तरी या मालिकेत तो निष्प्रभ ठरला होता. त्याच्या अपयशाने ब्रॉड ॲंड कंपनीचा गोलंदाजीतील चेव कमी झाला होता. तसेही खेळपट्टीने कट्टी केली की डोम्या नागासारखी फुत्करणारी ॲंडरसनची गोलंदाजी अगदीच साधारण होते. त्यामुळे त्याला निरोप द्यायला इंग्लिश संघाने मागेपुढे पाहिले नाही. व्यक्ती पूजे ऐवजी संघ हिताला प्राधान्य देणारा इंग्लिश संघ खरोखरच कौतुकास पात्र आहे. नाही तर आपल्या कडे एखाद्या खेळाडूवर महान आहे चा ठप्पा बसला की त्याची कामगिरी, प्रदर्शन कितीही सुमार झाले तरी त्याला बाहेर काढायची कोणाचीच हिम्मत होत नाही.
पहिल्या दोन्ही कसोटीत इंग्लिश संघ फलंदाजी, गोलंदाजीत ढेपाळल्याने त्यांनी ख्रीस वोक्स आणि मोईन अली या अष्टपैलू खेळाडूंसोबत सुपरफास्ट मार्क वुडची भरती केल्याने संघाचे संतुलन साधले गेले. एरवी चारशेचा टप्पा गाठणारा कांगारूं संघ तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावात तिनशेचा पल्ला गाठू शकला नाही. मार्क वुडने आपल्या वेगाने पहिल्या डावात कांगारूंचा जबरदस्त हादरे देत पाच बळी, तर ख्रीस वोक्सने त्याला सुंदर साथ देत तीन बळी घेतले. या वेगवान जोडीच्या जुगलबंदी स्टुअर्ट ब्रॉडनेही दोन बळी घेत कांगारूंना अवघ्या साठ षटकांत तिनशेच्या आत रोखले.
कांगारूंच्या दुसऱ्या डावातही या वेगवान त्रिकुटाचा जलवा बघायला मिळाला आणि कांगारू संघ सव्वा दोनशेत आटोपला. कांगारूतर्फे ख्वाजा, लाबुशेन आणि ट्रॅव्हिस हेडने थोडाफार प्रतिकार केला परंतु इंग्लंडला मोठे लक्ष्य देण्यात ते अपयशी ठरले. मालिकेत परतण्यासाठी इंग्लंडला २५१ धावांची गरज होती आणि इथे त्यांनी पुन्हा एकदा बॅझबॉल स्टाईलने कांगारूंचा प्रतिकार करायचे ठरवले. कांगारूंचे गोलंदाजी आक्रमण पॅट कमीन्स आणि स्टार्क वर अवलंबून होते. त्यांच्या दिमतीला मिचेल मार्श आणि स्कॉट बोलॅंड होते. तर फिरकीपटू म्हणून टॉड मर्फी होता. मात्र जो प्रभाव, दरारा नॅथन लायनचा होता, टॉड मर्फी त्याच्या आसपासही नव्हता. हीच बाब इंग्लिश संघाच्या पथ्यावर पडली.
चौथ्या दिवशी २५१ धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघ ०६ बाद १७१अशा संकटात सापडला होता. पण हॅरी ब्रुक आणि ख्रिस वोक्सने ५९ धावांची दमदार भागिदारी करत हे संकट टाळले. मात्र हॅरी ब्रुक बाद होताच वोक्स,वुड जोडीने चिवट झुंज देत बहुमुल्य २१ धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. अंतिम क्षणी मिशेल स्टार्कने इंग्लिश फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले परंतु दुसऱ्या टोकाला त्याला फारशी साथ मिळाली नाही. पहिल्या डावात सहा बळी टिपणारा पॅट कमीन्स दुसऱ्या डावात केवळ एक बळी घेऊ शकला.
ॲशेस मालिकेतले तिन्ही सामने निकाली लागल्याने निश्चितच कसोटी प्रेमींनी समाधानाचा सुस्कारा सोडला असेल. वेगवान खेळ हे या सामन्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. नाही तर कुंथत कुंथत खेळण्याने प्रेक्षक कसोटी पासून दुरावल्याचे वाटत होते. ऑसी संघाने पहिल्या दोन कसोटी जिंकूनही तिसऱ्या सामन्यात इंग्लंड प्रमाणे संघात तीन बदल करून विनिंग कॉम्बिनेशन बदलायचे नसते या अंधश्रद्धेला फाटा दिला आहे.बरेचदा संघ जिंकत असतो परंतु काही रंजले गांजले वयस्कर खेळाडू विनाकारण संघात जागा अडवून बसतात.
अशा पार्श्वभूमीवर कांगारू संघाचा कित्ता टीम इंडियाने गिरवायला हवा. भलेही या कसोटीत कांगारू पराभूत झाले असले तरी संघनिवड करताना किंवा रोटेशन पॉलिसी करतांना ते अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. प्रदर्शन खालावले असतांनाही एखाद्या खेळाडूला निव्वळ अनुभवामुळे किंवा महान है, महान है करत संघात अंडी उबवण्यासाठी ठेवणे योग्य नव्हे. त्याऐवजी फॉर्म, फिटनेस, खेळण्याची भुक असलेले खेळाडू मेरीटवर टीम इंडियात निवडले गेले तर आपला संघ सुद्धा चॅम्पियन संघ होऊ शकतो.
दि. १० जुलै २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++