
साद अंतरीची
यमुनेच्या तीरावरी
नादावली ही बासरी
राधा झाली गोरीमोरी
आतुरली ही अंतरी
आज वाटते मनाला
सोळा शृंगार सजावे
हरीरंगी रंगण्यास
ल्यावे रंग नवे नवे
नाकी नथ पाणीदार
चंद्रकोर भाळावर
वेणीमध्ये गुंफलेले
सुरंगीचे वळेसर
गेला कुठे माझा हरी
शोधू तरी कुठे याला
साद अंतरीची माझ्या
ऐकू का न ये हरीला?
तळी कदंबाच्या नाही
माझा दिसला माधव
यमुनाही उदासली
बासरीचा नसे रव
राधा झाली कासावीस
डोळे अश्रूंनी दाटले
डोळे हरीचे हे कसे
असे भरुनिया आले?
रुणझुण पैंजणांची
श्रीहरीच्या येता कानी
गोकुळचा राधाधर
भारावला मनोमनी
राधा -कृष्णाच्या प्रीतीने
यमुनाही आनंदात
चराचर सृष्टी सारी
दंग झाली नर्तनात
निळ्या सावळ्या रंगाची
उधळण भवताली
निशाराणी पांघरते
शाल ही चांदणल्याली
प्रीतरस उसळला
साऱ्या गोकुळ नगरी
भक्तिमय देवत्वाची
अलौकिक कथा सारी
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
=====